बिनागुंडात पोहोचले शिक्षण विभागाचे अधिकारी
By admin | Published: May 17, 2016 12:59 AM2016-05-17T00:59:04+5:302016-05-17T00:59:04+5:30
भामरागड तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर व जंगल तसेच डोंगरांनी वेढलेल्या अतिशय दुर्गम व
भामरागड/अहेरी : भामरागड तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर व जंगल तसेच डोंगरांनी वेढलेल्या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील बिनागुंडा गावाला विद्या परिषद पुणेचे उपसंचालक सुरेश माळी यांच्यासह शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी भेट देऊन तेथील पालकांसोबत चर्चा केली.
यावेळी त्यांच्यासोबत भिमाशंकर पुणेचे चेतन सोमवंशी, उपशिक्षणाधिकारी राजू आकेवार, तालुका गुणवत्ता कक्षाचे प्रकाश दुर्गे, मुख्याध्यापक सुधाकर घोसरे व शिक्षक जे. सी. बडगे उपस्थित होते.
बिनागुंडा हे गाव लाहेरीपासून १९ किमी अंतरावर आहे. बिनागुंडाला जात असताना लाहेरीपासून १० किमी अंतरावर गेल्यानंतर मार्गावर गाडी फसली. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना पुढील नऊ किमीचा प्रवास पायीच करावा लागला. बिनागुंडा गावात गेल्यावर त्यांनी तेथील अनुदानित विनोबा आश्रमशाळेला भेट दिली. मात्र ती शाळा कुलूपबंद होती. सरकारी दवाखानासुध्दा कुलूपबंदच होता. गावातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसोबत अधिकाऱ्यांनी संवाद साधला. मुले फार घाबरलेली होती. ती सुरूवातीला जवळ येत नव्हती. काही वेळांनी ती पालकासोबत जवळ आलीत. बिनागुंडा येथे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करावे, असे मार्गदर्शन शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)