चौकशीसाठी अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनला हजेरी
By admin | Published: November 11, 2016 01:19 AM2016-11-11T01:19:17+5:302016-11-11T01:19:17+5:30
जिल्हा परिषद गडचिरोली येथे २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात पोलीस विभागाकडून वेगाने चौकशी सुरू झाली असून
बोगस शिक्षक बदली प्रकरण : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह सात जणांना बजावली होती नोटीस
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली येथे २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात पोलीस विभागाकडून वेगाने चौकशी सुरू झाली असून या प्रकरणी पोलीस स्टेशनला भादंवि ४०९, ४२०, ४६८, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले.
आता गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांनी ४ नोव्हेंबर २०१६ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना पत्र देऊन सदर गुन्ह्याच्या तपासासंबंधाने जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत ३१ मे २०१३ नंतर झालेल्या बदल्यांची चौकशी करण्याकरिता उल्हास नरड (तत्कालीन शिक्षणाधिकारी), राऊत (तत्कालीन वित्त अधिकारी), सी. वाय. शिवणकर (सहायक प्रभारी अधिकारी पंचायत समिती धानोरा), अमोल रापुरकर (वरिष्ठ सहायक शिक्षण विभाग माध्यमिक), पी. सी. पराते (सहायक आरोग्य विभाग), अखिल श्रीरामवार (पंचायत समिती आरमोरी), फिरोज लांजेवार (पं.स. आरमोरी) यांना ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याबाबत समज देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती देताना तपास अधिकारी व गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी विजय पुराणिक यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व व्यक्तींना ४ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र देण्यात आले होते. यातील काही अधिकारी बदली होऊन गेले आहेत. सध्या मी उच्च न्यायालय नागपूर येथे आहे. यापैकी नेमके कोण आले होते. हे दस्तावेज बघूनच सांगावे लागेल, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.
या प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व अनेक पदाधिकारीही सहभागी आहेत. त्यामुळे पोलिसांना आता त्यांचीही चौकशी करावी लागण्याची शक्यता आहे. अनेकांनी शिक्षकांकडून पैसे घेऊन या बोगस बदल्यांचा आकडा वाढविला होता. (जिल्हा प्रतिनिधी)