अधिकाऱ्यांनी पाळला लक्षवेध दिन
By admin | Published: July 13, 2016 02:15 AM2016-07-13T02:15:30+5:302016-07-13T02:15:30+5:30
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊनही निर्णय झाले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा पुढाकार
गडचिरोली : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊनही निर्णय झाले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने लक्षवेध दिन पाळण्यात आला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन सादर केले.
सातवा वेतन आयोग योग्य सुधारणांसह राज्यात विनाविलंब लागू करावा, वेतन आयोग लागू करण्यापूर्वी समानता निश्चित करून विद्यमान वेतनातील त्रूटी दूर कराव्यात, केंद्रांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, जुनी पेंशन योजना व नवीन पेंशन योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय उपलब्ध असावा, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचे बाल संगोपन रजा मंजूर करावी, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाण ६० वर्ष करावे, सेवाअंतर्गत आश्वासित प्रगत योजनेतील ५ हजार ४०० च्या ग्रेड पेची मर्यादा काढून घ्यावी, प्रशंसनीय कामाबद्दल १ जानेवारी २०१६ पासून आगाऊ वेतनवाढ लागू करावी, मानीव विलंबन कार्यपद्धती बंद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, भूसंपादन अधिकारी मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, डॉ. प्रशांत आखाडे, बीडीओ शालिक पडघन, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीरामे, समाजकल्याण अधिकारी मोहतुरे, डॉ. शिरीष रामटेके, डॉ. शशिकांत शंभरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. विनोद बिटपल्लीवार, डॉ. किशोर वाघ, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. श्रद्धा वासनिक, डॉ. हेमंतकुमार कोवाची, डॉ. प्रदीप रणवरे, डॉ. अरविंद रेहपाडे, डॉ. मो. आरिफ उपस्थित होते.