...अन् ती घराबाहेर येताच उभे घर पत्त्यांसारखे कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 01:46 PM2021-09-23T13:46:09+5:302021-09-23T13:48:44+5:30
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात एक महिला घरची कामे करत असताना काहीतरी हालचाली होत असल्याचे तिला जाणवले. ती तशीच घराबाहेर पडली आणि क्षणार्धात त्यांचे राहते घर पत्त्यांसारखे कोसळले.
गडचिरोली : पावसामुळे जीर्ण झालेल्या त्या घरातील लोक बाहेर गेले होते, पण एक महिला घरातील कामे करत होती. अचानक घर हलायला लागले. काहीतरी विपरित घडणार याचा अंदाज तिला आला आणि ती तशीच घराबाहेर धावली. त्याच क्षणी राहते घर पत्त्यांसारखे कोसळले. ही घटना चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे मंगळवारी सकाळी घडली.
कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण वेळेप्रसंगी समयसुचकता ही अतिशय महत्वाची असते. मंगळवारी सकाळी घर मालक गुलाब नामदेव म्हशाखेत्री हे घराबाहेर होते. त्यांची आई एकटीच घरातील कामे करत होती. यावेळी घर हलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वेळ न दवडता लगेच ती घराबाहेर पडली, आणि क्षणार्धातच घर जमीनदोस्त झाले.
महिलेने वेळीच समयसूचकता दाखवत घराबाहेर पडल्यामुळे या घटनेत जीवितहानी टळली. म्हशाखेत्री यांचे हे घर कौलारु आणि जुने होते. पावसामुळे भिंती ओल जाऊन खसल्या होत्या. घर पडल्यामुळे त्यांचे अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. आता पाण्यापावसाच्या दिवसात रहायचे कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. तरी याची दखल घेऊन शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामवासियांकडून केली जात आहे.