जुने ते सोने : नातवाची वरात... बैलबंडीतून लय जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:04 PM2023-03-29T12:04:23+5:302023-03-29T12:07:11+5:30
आजोबाची संकल्पना; फोकुर्डीत अवाजवी खर्चाला फाटा देत जपली परंपरा, शेतकरीपुत्र नवरदेवाची सोशल मीडियावरही हवा
रोशन थोरात
भेंडाळा (गडचिरोली) : वाहनांची साधने नसल्याने पूर्वी लग्नाची वरात बैलबंडीतून निघायची, पण आधुनिक काळात महागडी वाहने सजवून त्यातून वरात काढण्याची तरुणाईत स्पर्धा आहे. मात्र, याला फाटा देत चामोर्शीतील फोकुर्डी गावात आजोबांनी नातू व नातसुनाची चक्क बैलबंडीतून वरात काढली. ही वरात परिसरात चर्चेचा विषय ठरली.
फोकुर्डी येथील उद्धवराव गोहने यांच्या नातवाचे २७ मार्चला लग्न झाले. नातू व नातसून यांची वरात पारंपरिक पद्धतीने काढण्याची आजोबांची इच्छा होती. त्यास कुटुंबीयांनीही होकार दिला. मग काय सजविलेल्या बैलबंडीतून फोकुर्डी ते चिखली अशी वरात निघाली. वरातीत नवरदेवाकडून हायटेक चारचाकी वाहन सजवून डीजे लावला जातो, पण उद्धवराव गोहने यांनी नातू गौरवची वरात बैलबंडीतून काढून परंपरा व साधेपणा जपण्याचा संदेश दिला.
बैलबंडीची वरात....सोशल मीडियावरही जोरात...
बैलबंडी, रेंगी, सनईचा सप्तर्षी सूर असा वरातीचा थाट होता. ही वरात जेव्हा फोकुर्डी ते भेंडाळा येथे पोहोचली, तेव्हा रस्त्याने जाणारे सर्वच जण अवाक झाले आणि कधी बैलबंडी, रेंगीची लग्न वरात न बघणाऱ्यांनी या विवाहसोहळ्यांची वरात कुतुहलाने बघत होते.
या वरातीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या विवाह सोहळ्याची दिवसभर भेंडाळा परिसरात चर्चा सुरू राहिली.