पोलिसांच्या मदतीने वृद्ध दाम्पत्याला मिळाला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:48+5:30
सिंधूताई आकुलवार या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. वृध्द दाम्पत्य ५० वर्षांपासून मार्र्कंडा कं. येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षापूर्वी त्यांचे स्वत:चे घर पावसामुळे कोसळले. त्यानंतर त्यांनी लहानशी झोपडी तयार केली. यात दिवसभर ते राहायचे व रात्र मंदिरात काढायचे. तीन वर्ष हा दिनक्रम चालला.
सुधीर फरकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडा क. येथील मुरलीधर आकुलवार व त्यांच्या पत्नी सिंधू आकुलवार या वृध्द दाम्पत्याचे घर तीन वर्षापूर्वी पावसाने कोसळले. त्यामुळे हे दाम्पत्य झोपडी बांधून त्यात दिवसभर राहत होते. दरम्यान ८ आॅगस्ट २०१९ रोजी ही झोपडी पावसाने पडली. त्यानंतर पोलीस विभागाच्या पुढाकाराने या वृध्द दाम्पत्यांना नवीन घर बांधून देण्यात आले. पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुूळे या वृध्द दाम्पत्याला हक्काचा व पक्का निवारा मिळाला.
सिंधूताई आकुलवार या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. वृध्द दाम्पत्य ५० वर्षांपासून मार्र्कंडा कं. येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षापूर्वी त्यांचे स्वत:चे घर पावसामुळे कोसळले. त्यानंतर त्यांनी लहानशी झोपडी तयार केली. यात दिवसभर ते राहायचे व रात्र मंदिरात काढायचे. तीन वर्ष हा दिनक्रम चालला. दरम्यान ८ आॅगस्ट २०१९ रोजी मूुसळधार पावसाने आकुलवार दाम्पत्याच्या झोपडीचे छत व भिंत पूर्णत: कोसळली. सुदैवाने यात ते बचावले. मात्र आता राहायचे कुठे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. दरम्यान पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करीत आकुलवार दाम्पत्यांना २८ दिवसात नवीन घर बांधून दिले. या उपक्रमातून पोलिसांनी माणुसकीचा परिचय दिला. आकुलवार दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या दाम्पत्याची संपूर्ण माहिती संजय पंदिलवार यांनी पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल यांना दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षकांनी प्रत्यक्ष घरी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्ष डॉ. मोहीतकुमार गर्ग, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक मनिष कनवालिया, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्याशी या संदर्भात चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर पोलीस विभागाने घराचे बांधकाम हाती घेतले. ठाणेदार निर्मल यांनी या कामाची माहिती सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.
कर्मचाºयांच्या मदतीने २८ दिवसात घर बांधून तयार झाले. त्यानंतर स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य, फर्निचर व कपडे या वृध्द दाम्पत्याला देण्यात आले. हे सर्व पाहून मुरलीधर व सिंधूताई यांच्या चेहºयावर आनंदाश्रू वाहत होते. वास्तूपुजनाच्या दिवशी हा सर्व प्रसंग पाहून हे दोघेही भारावून गेले.
१३ ला झाला गृहप्रवेश
१३ सप्टेंबर रोजी सदर नवीन घराचे वास्तूपूजन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यानंतर हे घर आकुलवार दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. वृध्द दाम्पत्यावर आलेल्या संकटाला पोलीस विभाग धावून आला. आष्टी पोलिसांनी केलेले हे काम चांगले आहे, असे अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कनवालिया यांनी सांगितले.
वेतनातून वर्गणी गोळा
आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातून आकुलवार यांच्या घर बांधकामासाठी काही रक्कम गोळा केली. यासाठी पोलीस विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही आर्थिक मदत घेतली. तीन ते चार लाख रुपयातून सदर वृध्द दाम्पत्यांना नवीन पक्के घर बांधून देण्यात आले. या काही नागरिक व पत्रकारांनीही मदत केली.