शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद, गडचिराेली जिल्ह्यातील शालेय उपक्रमांची केली प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 02:31 PM2022-09-06T14:31:08+5:302022-09-06T14:31:34+5:30
शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गडचिराेली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आसरअल्ली येथील शिक्षक खुर्शीद शेख यांनी मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला. शेख यांनी फुलाेरा व विविध शालेय उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमांचे काैतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करून देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मुलांना समान व गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत काही महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयांमध्ये विद्यार्थी केंद्रीत विचार असून, संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवरून काम करेल. यासाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गडचिराेलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्ह्यातील १२ शिक्षक उपस्थित होते.