सलग दुसऱ्या दिवशी वाघाने साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 11:06 PM2022-10-08T23:06:51+5:302022-10-08T23:07:20+5:30

रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता.

On the second day in a row, Wagha achieved the innings | सलग दुसऱ्या दिवशी वाघाने साधला डाव

सलग दुसऱ्या दिवशी वाघाने साधला डाव

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : धानाचे भारे बांधण्यासाठी लागणारी सिंध आणण्यासाठी दोन सहकाऱ्यांसाेबत जंगलात गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. ही घटना आरमाेरी तालुका मुख्यालयापासून अगदी १० किमी अंतरावरील रामाळा जंगलातील कक्ष क्रमांक ४१ मध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी एका गुराख्याचा बळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वाघाने हल्ला केल्यामुळे नागरिकांसह वनविभागाचे अधिकारीही चक्रावून गेल्या आहेत. चालू वर्षातील ही १७ वी घटना आहे.
आनंदराव पांडुरंग दुधबळे (६५, रा. रामाळा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव पांडुरंग दुधबळे हे आपल्या दोन सहकाऱ्यांसाेबत शनिवारी सकाळी सायकलने रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता. वडसाचे सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक भारत शेंडे, कमलेश गिन्नलवार, विकास शिवणकर आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच बेड व ट्रॅप कॅमेरे लावले. 

...अन् सहकारी हाक मारतच राहिले 
आनंदराव दुधबळे यांच्यासाेबत जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या दाेन सहकाऱ्यांची सिंध कापून झाली. तेव्हा त्यांनी आनंदरावला मोठमोठ्याने हाक मारली; परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी काही वेळ आवाज दिला व शाेधसुद्धा घेतला. त्यानंतर मात्र त्यांना वाघहल्ल्याचा संशय आल्याने दोघेही गावात परतले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुपारी आनंदरावचा मृतदेह सापडला. सिंध कापण्याच्या स्थळापासून जवळपास दाेन किमी अंतरापर्यंत वाघाने आनंदरावला फरफटत नेले हाेते.

वाघांना पकडण्यासाठी ताडाेबा व अमरावतीतील टीम दाखल

आरमाेरी : सलग दाेन दिवस आरमाेरी तालुक्यात दाेघांचा बळी घेणाऱ्या वाघांना पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाेबा व अमरावती येथील रेक्स्यू टीम वडसा वनविभागात दाखल झाली. सदर टीम वाघांना पकडण्यासाठी कसाेसीचे प्रयत्न करणार आहे.वडसा वनविभागातील आरमोरी, पाेर्ला वन परिक्षेत्रातील जंगल परिसरात अनेक लोकांचा बळी सीटी-१ वाघाने घेतला. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील रेस्क्यू टीम आली आहे. तर कुरंजा येथील ठेमाजी माधव आत्राम ह्या गुराख्याचा बळी टी- ६ या वाघाने घेतला असल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी उशिरा वनविभागाने टी-६ वाघाला जेरबंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी अमरावतीवरून रेस्क्यू टीम बोलविण्यात आली. ही टीम शनिवारी पाेर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाली. दोन्ही टीम वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डॉ. किशोर मानकर यांनी पाेर्ला वनपरिक्षेत्रात टी- ६ वाघाला जेरबंद करण्यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या.

वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी केली पाहणी
गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर व वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी रामाळा जंगल परिसरात तीन किलोमीटर आत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वाघाची ओळख पटवावी, गस्त वाढवा, गावागावात दवंडी देऊन लोकांना जागृत करावे, मुख्यालयी राहून काम करा, अशा  सूचना  वन कर्मचाऱ्यांना देत एकूणच परिस्थितीची माहिती जाणून घेतली. 

दुधबळे कुटुंबाला ३० हजारांची मदत
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या आनंदराव दुधबळे यांच्या कुटुंबाला वनविभागातर्फे तातडीची ३० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. तसेच जंगलात वाघाचा वावर असल्याने कुणीही आत जाऊ नये, शेतावर जाताना योग्य खबरदारी घेऊन शेतीची कामे करावीत, असे आवाहन वनविभागाने केले.

 

Web Title: On the second day in a row, Wagha achieved the innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.