गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमकीत एक जवान जखमी, उपचारासाठी नागपूरला हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 01:46 PM2022-05-03T13:46:40+5:302022-05-03T14:01:19+5:30
पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातील जंगलात गस्त करीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात आज (दि. ३) सकाळच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्याला तातडीने हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार, पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातील जंगलात गस्त करीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. यात एक जवान जखमी झाला. पोलीस जवानांनी लगेच सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर दिले असता नक्षलवादी जंगलात पळून गेले. जखमी जवानावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात पोलीस जवानांना यश आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक वाढवण्यात आली आहे. तसंच नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.