रस्त्यावर कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकून एक ठार
By संजय तिपाले | Published: July 22, 2024 12:32 PM2024-07-22T12:32:04+5:302024-07-22T12:32:32+5:30
आलापल्ली - मुलचेरा मार्गावरील घटना: अतिवृष्टीने जंगलात झाडांची पडझड
गडचिरोली: जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरु असून विविध ठिकाणी घरे, झाडांची पडझड सुरु आहे. आलापल्ली - मुलचेरा मार्गावर घनदाट जंगल असून तेथे कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकल्याने परप्रांतीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.
नवीनकुमार रेड्डी (४०,हमु. आलापल्ली ता. अहेरी, मूळ आंध्रप्रदेश) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन ते आलापल्ली- मुलचेरा मार्गाने जात होते.आलापल्लीपासून दोन किमी अंतरावर झाड कोसळले होते. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी झाडाला धडकली. यात नवीन यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन २२ रोजी सकाळी तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, जिल्ह्यात पूरसंकट कायम असून अद्यापही नागपूर व चंद्रपूरशी संपर्क तुटलेला आहे. सध्या २७ मार्ग बंद असून रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णत: प्रभावित झाले आहे.
१२ घरांचे नुकसान
दरम्यान, २१ जुलै रोजीच्या पावसाने ठिकठिकाणी आतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. जिल्हाभरात १२ घरांचे नुकसान झाले असून एक गोठाही क्षतिग्रस्त झाला.