ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:25 PM2018-01-18T23:25:00+5:302018-01-18T23:25:24+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी व सिरोंचा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर व तीन किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा/आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी व सिरोंचा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर व तीन किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.
सिरोंचा-आलापल्ली मार्गावर असलेल्या रोमपल्ली फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक इसम जागीच ठार झाल्याची घटना मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर घडली. प्राप्त माहितीनुसार, वेंकय्या लक्ष्मय्या अग्गुवार (३७) रा. सुपाका (तेलंगणा) हे आलापल्लीवरून सिरोंचाकडे येत होते तर लक्ष्मण चंद्रय्या कुळमेथे (२७) रा. वडदेल्ली हे सिरोंचा येथील काम आटोपून झिंगानूरकडे जात असताना दोन दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात वेंकय्या लक्ष्मय्या अग्गुवार हा जागीच ठार झाला. दुसऱ्याला रात्री ८ वाजताच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे रुग्णवाहिकेने आणले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास बामणी पोलीस करीत आहे.
आलापल्लीवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकने आष्टीवरून बोरीकडे जाणाºया दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चौडमपल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर घडली. चंद्रपूर येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच ३४ एम ५०१६ क्रमांकाचा ट्रक चंद्रपूरकडे येत होता. कोनसरी येथून पेंटा दिना पानेमवार हा अन्य दोघांसोबत रामपूर (बोरी) येथे दुचाकीने जात होता. दरम्यान ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे पेंटा दिना पानेमवारसह पत्नी निता पानेमवार, सुवर्णा गुरूदास गुरूनुले हे तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर आष्टीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू
गडचिरोली येथून अहेरीकडे दुचाकीने जात असताना मागे बसलेले अमोल बाबुराव वडनेरवार यांना हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना आष्टी येथील पेट्रोलपंपाजवळ गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.