तीन अपघातात एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:07 PM2017-11-14T23:07:34+5:302017-11-14T23:07:54+5:30
तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव/फुलसावंगी : तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकी गतिरोधकावरून उसळून झालेल्या अपघातात अमरावतीचा तरुण ठार झाला. तर टो करून जाणारी कार उभ्या ट्रॅक्टरवर आदळली. त्यात दोन जण जखमी झाले आणि ऊस भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली महागाव शहरात उलटली.
सुमितसिंह अजयसिंह ठाकूर (२८) रा. अमरावती असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. तो आपला मित्र जितेंद्र ओंकारसिंग ठाकूर (३१) रा. अमरावती याच्यासोबत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे जात होते. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास फुलसावंगीजवळील गतिरोधकावर दुचाकी उसळली आणि त्यात सुमितसिंह जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुसरा अपघात उमरखेड-महागाव रस्त्यावर सुकळी गावाजवळ मंगळवारी सकाळी घडला. टो करून जाणारी सॅन्ट्रोकार उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यात बंटी इंगळे (१९) रा. महागाव असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो कार चालवित होता. त्याला प्रथम उमरखेड येथे आणि नंतर नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर टाटा मॅजिक चालक राजू गावंडे किरकोळ जखमी झाला. टाटा मॅजिक वाहनाला ही कार बांधून नांदेड येथे घेऊन जात होते.
तिसरा अपघात महागाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर घडला. सोमवारी रात्री ऊसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.