मशरूम गोळा करण्यासाठी जंगलात जाणे 'त्याच्या' जीवावर बेतले; वाघाने झडप घालून फरफटत नेले
By गेापाल लाजुरकर | Published: September 8, 2022 04:17 PM2022-09-08T16:17:20+5:302022-09-08T17:18:02+5:30
देसाईगंज तालुक्यात एकाचा वाघाने घेतला बळी, दुसऱ्याने पळ काढत वाचवला जीव
कुरूड : (गडचिराेली) : गावातील एका मित्रासह जंगलात मशरूम गाेळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ८ सप्टेंबर राेजी देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे घडली. प्रेमलाल प्रधान (४४) रा. उसेगाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
देसाईगंजपासून १० किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील प्रेमलाल प्रधान व वासुदेव झोडे (३२) हे दाेघेही गुरुवारी सकाळी ७ वाजता गावाला लागूनच असलेल्या जंगलात अळंबी (मशरूम) गाेळा करण्यासाठी गेले. दाेघेही जवळपास राहूनच अळंबी शाेधत हाेते. दरम्यान ७:३० वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने प्रेमलाल प्रधान यांच्यावर झेप घेऊन त्यांना फरफटत नेले.
वाघाने हल्ला केला हे पाहताच साेबती वासुदेव झाेडे हे भयभीत झाले व त्यांनी घटनास्थरावरून पळ काढला. गावात पाेहाेचून नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी वनविभागाला कळविले. वन भागाचे वनपरिक्षेत्राधिकारी चव्हाण, विजय धांडे, के. वाय. कऱ्हाडे, वनरक्षक सलीम सयद हे काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाले; परंतु तेथे काहीच आढळले नाही.
परिसरात शाेधमाेहीम सुरू केली असता, घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर प्रेमलालचा मृतदेह आढळला. वाघाने छाती व मानेचा भाग खाल्ला हाेता. वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन ताे उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठविला. उसेगावला लागूनच जंगल असल्याने अगदी २ किमी अंतरावर ही घटना घडली. दरम्यान प्रधान कुटुंबाला वन विभागाने २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत दिली.
चार दिवसांपूर्वीच दिली हाेती दवंडी
काेंढाळा परिसरात वाघाचा वावर आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात ताे अधूनमधून कैद हाेत आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाऊ नये, अशी दवंडी वनविभागाने परिसरातील गावांमध्ये ४ सप्टेंबर राेजी दिली हाेती. असे असतानाही उसेगाव येथील दाेन इसम जंगलात गेले. यापूर्वी याच जंगलात वाघाने दाेन नागरिकांना ठार केले हाेते. त्यानंतर आता पुन्हा एकाला ठार केले. त्यामुळे जंगलालगत शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांसमाेर आपण शेती कशी कसावी असा प्रश्न आहे.