बँकेसाठी अद्यापही करावा लागतो ५० किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 02:51 PM2024-08-14T14:51:39+5:302024-08-14T14:52:41+5:30

नागरिकांचे हाल : १२ लाख लोकसंख्येसाठी १३० शाखा

One still has to travel 50 km to the bank | बँकेसाठी अद्यापही करावा लागतो ५० किमी प्रवास

One still has to travel 50 km to the bank

दिगांबर जवादे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
प्रत्येक गावापर्यंत बँकसेवा पोहोचली पाहिजे, हे धोरण आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांना बँक सेवांसाठी ५० किमीचे अंतर गाठावे लागत असल्याचे वास्तव आहे. शहरांमध्ये बँकांची गर्दी होत असताना ग्रामीण व दुर्गम भागात मात्र बँकसेवा पोहोचली नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे बँक खाते कसे निघणार, असा प्रश्न आहे.


जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे. बँकांची संख्या मात्र केवळ १३० एवढी आहे. त्यातही काही तालुक्यांमध्ये योजनांची संख्या नगण्य आहे. शासकीय योजनांचे पैसे आता बँक खात्यातच जमा करण्याचे धोरण शासनाने सुरू केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी असल्याने येथील नागरिक शासकीय योजनांसाठी पात्र ठरतात. मात्र त्यांच्यापर्यंत बँक सेवाच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. बँकेचा खाता असला तरी ५० किमी अंतर सायकलने जाऊन त्यातील पैसे काढणे अनेकांना व्यावहारिक वाटत नाही. तालुकास्थळी असलेल्या बँकेचे व्यवहार करण्यासाठी एक दिवसाच्या मुक्कामाने जावे लागते.


प्रत्येक शासकीय योजनेच्या लाभासाठी बँक खाते आवश्यक आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे बँक खाते नसल्याने ते योजनेसाठी पात्र ठरत नाही. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये तर बोटावर मोजण्याएवढ्या बँकेच्या शाखा आहेत.


बीसी चांगला उपाय मात्र संख्या वाढवावी
बँकेची शाखा स्थापन करून ती चालविण्यासाठी महिन्याला लाखो रूपये खर्च होतात. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी असलेल्या ठिकाणी बँक शाखा स्थापन करणे व्यावहारिक नाही. त्यासाठी व्यावसायिक प्रतिनिधी (बीसी) हा एक चांगला पर्याय आहे. बँक एखाद्या व्यक्तीला व्यावसायिक प्रतिनिधी नेमते. तो व्यक्ती बँकेचे व्यवहार दुचाकीने गावात जाऊन पूर्ण करते. आर्थिक उलाढालीनुसार त्याला बँक कमिशन देते. बीसी हा बँकेचा व्यवहार करीत असल्याने त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. यातून नागरिकांना गावातच बँकसेवा मिळेल. तसेच युवकांना रोजगार मिळेल.


गाव तेथे रस्त्याची प्रतीक्षा

  • एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये अजूनही अनेक गावांचा पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटलेला असतो. देश चंद्रावर यान पाठवत असताना गावात मात्र जायला रस्ता नाही.
  • जवळच्या नाल्यावर पूल नाही. परिणामी गर्भवती महिलेला किवा आजारी व्यक्तीला खाटेने रुग्णालयात दाखल करावे लागते.

 

बीसींची संख्या वाढविण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. बीसीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. बहुतांश बँका बीसीची नियुक्ती करतात. बीसीच्या रोजगारासाठी युवकांनी बँकांशी संपर्क साधावा, बीसीमुळे गावातच बँकसेवा मिळण्यास मदत होईल.
- प्रशांत धोंगळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

Web Title: One still has to travel 50 km to the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.