एकाची प्रकृती ढासळली
By Admin | Published: June 3, 2016 01:17 AM2016-06-03T01:17:53+5:302016-06-03T01:17:53+5:30
निस्तार हक्काप्रमाणे बुरूड कारागिरांना चांगल्या प्रतिचा बांबू पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी रखरखत्या उन्हात मंडप टाकून बुरूड समाज
बुरूड कारागिरांचे आमरण उपोषण : उपजिल्हा रूग्णालयात हलविले
आरमोरी : निस्तार हक्काप्रमाणे बुरूड कारागिरांना चांगल्या प्रतिचा बांबू पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी रखरखत्या उन्हात मंडप टाकून बुरूड समाज बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारपासून आरमोरी परिक्षेत्रासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
बुरूड कारागिरांना चांगल्या प्रतिचा बांबू उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी बुधवारपासून खुशाल गराडे, मुकुंदा गराडे, राजेश्वर गराडे, सुरेश हिरापुरे, गोमा गराडे, रामकृष्ण गराडे आदी उपोषणाला बसले. परंतु दुसऱ्या दिवशी मुकुंदा बाजीराव गराडे ेयांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
बुरूड समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. बांबूपासून बुरूड समाज वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. त्यानंतर बाजारपेठेत सदर वस्तूंची विक्री करून आपली उपजिविका करीत आहे. परंतु एप्रिल महिन्यापासून बुरूड समाजातील कारागिरांना बांबू मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. निस्तार दरानुसार चांगल्या प्रतिचा किमान ५० हजार नग बांबू बुरूड कारागिरांना उपलब्ध करून द्यावा. यासह अन्य मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्धारही उपोषणकर्त्यांनी केला आहे. (वार्ताहर)