६५ वर्षांपासूनचे दाखल खारीज रजिस्टर झाले आॅनलाईन
By admin | Published: July 13, 2017 01:48 AM2017-07-13T01:48:06+5:302017-07-13T01:48:06+5:30
सद्य:स्थितीत गेल्या अनेक वर्षापासूनचे खूप जुने दाखल खारीज रजिस्टरचे उतारे शाळांमध्ये जीर्ण अवस्थेत आहेत.
जिल्ह्यात प्रथम अभिनव उपक्रम : सिर्सी जि. प. शाळेच्या शिक्षकाचा पुढाकार
महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : सद्य:स्थितीत गेल्या अनेक वर्षापासूनचे खूप जुने दाखल खारीज रजिस्टरचे उतारे शाळांमध्ये जीर्ण अवस्थेत आहेत. कुणी जर टीसी मागत असेल तर शिक्षकास ते शोधण्यास खूप वेळ जातो. जुने उतारे झेरॉक्स करून प्रमाणित होतील, याचीही शाश्वती नाही. यावर उपाय म्हणून अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेतील अतिशय महत्त्वाचा दस्तावेज असलेला दाखल खारीज रजिस्टर सुरक्षित ठेवण्यासाठी आरमोरी तालुक्यातील सिर्सी येथील जि. प. शाळेतील शिक्षक संतोष मने यांनी एक अभिनव प्रयोग राबविला आहे.
६५ वर्षापूर्वीपासूनचे या शाळेतील दाखल खारीज रजिस्टर स्कॅनिंग करून आॅनलाईन स्वरूपात रेकार्ड नोंदविला आहे. यासाठी त्यांना तीन महिने परिश्रम घ्यावे लागले. शाळेचा आॅनलाईन ब्लॉक तयार करून खऱ्या अर्थाने मने यांनी शाळा डिजिटल व आॅनलाईन केली आहे. त्यामुळे मोबाईलवरून आपला दाखल उतारा पाहावयास मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला. त्याची काहीशी सुरुवातही खेड्यातून झाली. जिल्ह्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान मिळावे म्हणून डिजिटल वर्गखोली बनविण्यावर भर दिला. मात्र तालुक्यातील सिर्सी जि. प. शाळेचे शिक्षक संतोष मने यांनी एक पाऊल पुढे टाकून शाळा डिजिटल करण्यासोबतच आॅनलाईन करण्याचा उपक्रम राबविला व हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
अनेक महत्त्वाची शासकीय कागदपत्रे उदाहरणात जातीचा दाखला, वृद्धांना वयाचा दाखला काढण्यासाठी इयत्ता चवथीच्या टीसीची गरज असते. मात्र बहुतांश शाळांमध्ये अनेक वर्षांपासूनचा जुना रेकार्ड जीर्ण स्वरूपात राहत असल्याने अर्जदारास टीसी मिळविण्यासाठी बराच वेळ जातो.
विद्यार्थ्यांना आपली जन्म तारीख व जातीची नोंद कशी लिहिली आहे, हे स्वत:च्या मोबाईलमध्ये पाहाता यावे, अर्जदारांचा वेळ वाचावा, मुख्याध्यापकास सुद्धा सुलभ व्हावे, तसेच शाळा प्रशासकीय स्तरावर नुसत्या टीव्हीने डिजिटल न होता आॅनलाईन व्हावी, या हेतूने हा आॅनलाईन उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील या पहिल्याच अभिनव प्रयोगामुळे कुठलाही व्यक्ती दाखल खारीज डाऊनलोड करून आपले दाखल खारीज उतारे पाहू शकतो. त्यामुळे हा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे. ग्रा. पं. चा संपूर्ण रेकार्ड आॅनलाईन होणे गरजेचे आहे. काही मोजक्या ग्रा.पं. याला अपवाद आहेत.
उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज
शाळांमध्ये महत्त्वपूर्ण असलेला दाखल खारीज रजिस्टर हा दस्तावेज योग्यरित्या ठेवणे गरजेचे आहे. यावर जन्माच्या व जातीच्या नोंदी आहेत. अनेक वर्षापासूनचा रेकार्ड नेहमी हातळल्यामुळे जीर्ण होत आहे. या प्रयोगामुळे जुना रेकार्ड आॅनलाईन स्वरूपात जशाच्या तशा नवीन राहणार आहे. याशिवाय वेळेची बचत होऊन दाखले वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्याची गरज आहे.