१४८ गावांसाठी केवळ १२ टॉवर्स; ऑनलाईन शिक्षण हाेणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 01:07 PM2021-08-10T13:07:38+5:302021-08-10T13:12:27+5:30

Gadchiroli News सिराेंचा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत १४८ गावे असताना केवळ १२ गावांत भारत संचार निगम लिमिटेडची सेवा पाेहाेचली आहे.

Only 12 towers for 148 villages; How to learn online? | १४८ गावांसाठी केवळ १२ टॉवर्स; ऑनलाईन शिक्षण हाेणार कसे?

१४८ गावांसाठी केवळ १२ टॉवर्स; ऑनलाईन शिक्षण हाेणार कसे?

googlenewsNext
ठळक मुद्दे वास्तव गडचिरोली जिल्ह्यातले

काैसर खान

गडचिराेली:  जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या सिराेंचा तालुक्यात माेबाईल कव्हरेजचे जाळे अद्यापही पसरले नाही. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत १४८ गावे असताना केवळ १२ गावांत भारत संचार निगम लिमिटेडची सेवा पाेहाेचली आहे. उर्वरित गावांमध्ये नसल्याने तालुक्यात ऑनलाईन शिक्षण हाेणार कसे? असा प्रश्न पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, बारा गावांमध्येही याेग्यप्रकारे कव्हरेज मिळत नसल्याची ग्राहकांची ओरड आहे.

सिरोंचा, बामणी, झिंगानूर, रोमपल्ली, रेगुंठा, अमरावती, वडधम, सिरोंचा पोलीस स्टेशन, पेंटिपाका, अंकिसा, आसरअल्ली, पातागुडम आदी १२ गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर्स आहे. दुर्गम भागांतील गावांमध्ये एकही खासगी मोबाईल टॉवर नसल्यामुळे बीएसएनएलमार्फत मिळणाऱ्या सेवेवरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागते. बहुतांश गावांत कव्हरेजच पाेहाेचत नाही. बहुतांश ग्राहक तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील कव्हरेजचा वापर करतात. यामुळे रोमिंगच्या रूपाने त्यांना आर्थिक भुर्दंड बसताे. केवळ दुर्गम भागांतच नाही तर सिराेंचा शहरातही कव्हरेज व मंद इंटरनेटची समस्या आहे.

मोबाईलने, दहा-बारा,वेळ प्रयत्न केल्यास तेव्हा कुठे फोन लागतो. या टॉवरची इंटरनेट सेवा तर नावापुरतीच राहील का? असे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वाटत आहे. इंटरनेट काम करत नसल्याने लाेकांना भुर्दंड साेसावा लागताे. त्यामुळे ग्रामीण भागात लवकर नवीन टॉवर उभारून मोबाईलधारकांना याेग्य सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

एकाही टाॅवरचा कव्हरेज २ कि.मी.वर पाेहाेचत नाही

सिराेंचातील टॉवरचा कव्हरेज शहर व परिसरातील राजीवनगरपर्यंत तसेच कारसपल्ली ते नगरमपर्यंत पाेहाेचते. एकाही टॉवरचा कव्हरेज तीन किलोमीटर अंतरापर्यंत पोहाेचत नाही. सिराेंचा शहरात बीएसएनएलचा एकच मनोरा हाेता. त्यामुळे येथे आणखी नवीन खासगी टॉवर उभारण्यासाठी परवानगी मिळाली. वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये टाॅवर उभारण्यात आला; परंतु या टॉवरचा कव्हरेजसुद्धा २ किलोमीटर अंतराच्यावर पाेहाेचत नाही.

 

सिराेंचा तालुक्यात बीएसएनएलचे एकमेव नेटवर्क आहे. बहुतांश गावात अद्यापही टाॅवर निर्मिती झाली नाही. ग्राहकांच्या साेयीसाठी अधिकचे टॉवर उभारून सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

अब्दुल रहिम, तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्ष सिरोंचा

 

सिराेंचा तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. कव्हरेज व इंटरनेट सेवा याेग्यप्रकारे नसल्याने नवीन टॉवर उभारण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहाेत.

सतीश भोगे, माजी नगरसेवक, सिरोंचा

 

शासनाने कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला; परंतु तालुक्यातील अनेक गावांत नेटवर्कच नाही तर ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार कसे? असा प्रश्न आहे.

रवी सल्लमवार, तालुकाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ

Web Title: Only 12 towers for 148 villages; How to learn online?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.