केवळ १५ टक्केच पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:39 PM2018-06-10T23:39:45+5:302018-06-10T23:39:45+5:30
पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो.
या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयीयीकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाऱ्यांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मे अखेरपर्यंत केवळ ८ हजार २७९ शेतकऱ्यांना ३० कोटी ८९ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक झाले आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात कर्ज वाटपाला मिळेल गती
गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या रोवणीला सर्वाधिक खर्च येतो. धानाच्या रोवणीची कामे जुलै महिन्याच्या सुरूवातीला सुरूवात होतात. कर्ज घेतलेले पैसे खर्च होण्याची शक्यता असल्याने शेतकरी जुन किंवा जुलै महिन्यातच कर्ज घेणे पसंत करीत असल्याने येत्या आठ दिवसांत कर्ज वाटपाला गती येईल अशी शक्तता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर
कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ मे पर्यंत ७ हजार ९३ शेतकऱ्यांना २४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने १ कोटी ६३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १ कोटी ३५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ४ लाख, आयडीबीआय बँक २४ लाख, एसबीआय १ कोटी ४३ लाख, युनियन बँक २३ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक २ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दरवर्षी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असले तरी या उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्ज वाटप या बँकांकडून केले जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.