केवळ 17 नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 05:00 AM2021-03-02T05:00:00+5:302021-03-02T05:00:27+5:30
गडचिराेली जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर १, जीएनएम काॅलेजच्या केंद्रावर ५, आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयात ६ व देसाईगंज रुग्णालयात ५ अशी एकूण १७ जणांना लस देण्यात आली. या १७ जणांमध्ये १६ ज्येष्ठ नागरिक व १ व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. काही नागरिकांना लस बद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांनी पहिल्या दिवशी लस घेण्याची हिंमत केली नाही. परंतु पुढील दाेन दिवसात हा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास आराेग्य विभागाने व्यक्त केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक व व्याधीने ग्रस्त असलेल्या नागरिकांना १ मार्चपासून काेराेना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी केवळ १७ नागरिकांनी लस घेतली आहे. अपेक्षेपेक्षा लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येते.
लसीकरणासाठी संबंधित व्यक्तिला सर्वप्रथम सेल्फ रजिस्ट्रेशन काेविन या संकेतस्थळावर नाेंदणी करता येते. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. मागील वर्षभरापासून नागरिक लसीची प्रतीक्षा करीत हाेते. त्यामुळे पहिल्या दिवशीच लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, जिल्हाभरात केवळ १७ नागरिकांनी लस घेतली आहे. यावरून अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे.
गडचिराेली जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर १, जीएनएम काॅलेजच्या केंद्रावर ५, आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयात ६ व देसाईगंज रुग्णालयात ५ अशी एकूण १७ जणांना लस देण्यात आली. या १७ जणांमध्ये १६ ज्येष्ठ नागरिक व १ व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे.
काही नागरिकांना लस बद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांनी पहिल्या दिवशी लस घेण्याची हिंमत केली नाही. परंतु पुढील दाेन दिवसात हा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास आराेग्य विभागाने व्यक्त केला.
काेराेना लस घेतल्यानंतर प्रकृती अगदी सामान्य आहे. लसीकरणावरून परत आल्यानंतर मी माझी दैनंदिन कामे केली. लसीकरणाबाबत काेणतीही भीती न बाळगता नागरिकांनी लस घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांना काेराेनाची भिती जास्त असल्यामुळे त्यांनी लस घेण्यासाठी आवर्जून जावे. लसीमुळे आपल्याला फायदा हाेईल, असा विश्वास वाटताे.
- पाेचम बाचलवार,
रा. काेटगल, लस घेतलेले ज्येष्ठ नागरिक.
काेराेनाचा सर्वाधिक धाेका ज्येष्ठांनाच असल्याचे आढळून आले. लसीकरण हा चांगला पर्याय आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात काेराेना प्रतिबंधक लस उपलब्ध हाेईल. आजपर्यंत अनेक आराेग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. त्यामुळे या लसीबाबत काेणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. प्रत्येक तालुका स्तरावरही लस उपलब्ध आहे. याचा लाभ घ्यावा.
- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली
अशी करा नाेंदणी
ऑनलाईन नाेंदणीसाठी नागरिकांनी selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर विहित माेबाईल क्रमांक टाकावा. माेबाईलवर एक ओटीपी येईल ती टाकल्यावर नाेंदणी रजिस्टर हाेईल. पुढे ओळखपत्र क्रमांक, नाव, लिंग, जन्म वर्ष टाकावे. व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी काेमाॅर्बिड बटनवर क्लिक करावे. त्यानंतर अकाऊंट डिटेलमध्ये जाऊन लसीकरण घेणाऱ्या जास्तीत जास्त चार लाेकांची नाेंदणी करता येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पासवर्ड तसेच माेबाईल नंबरने लाॅगिन करून उपलब्ध लसीकरण दिनांक व केंद्राची निवड करावी. माेबाईलवर नाेंदणी पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
नावे जाहीर केलेली खासगी रुग्णालये अनभिज्ञ
गडचिराेली शहरातील सिटी हाॅस्पिटल व धन्वंतरी हाॅस्पिटल या दाेन खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय असल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. पण, याबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याचे या दोन्ही
रुग्णालयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सामान्य नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र खाेल्या, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग असावा लागतो. परंतु वेळेवर हे सर्व करणे शक्य नसल्यामुळे या रुग्णालयांमध्ये सोमवारी कोणतेही लसीकरण होऊ शकले नाही. सुविधा तयार केल्यानंतर यामध्ये लसीकरणाला सुरुवात हाेण्याची शक्यता आहे. लसीकरणाची कोणतीही सोय किंवा पूर्वकल्पना नसताना सदर रुग्णालयांची नावे लसीकरणाच्या यादीत कशी आली? याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.