२४४ पैकी केवळ १८ गावांना मिळाले पाेलीस पाटील
By दिगांबर जवादे | Published: September 26, 2023 08:44 PM2023-09-26T20:44:31+5:302023-09-26T20:44:47+5:30
गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. गावातील स्थिती पाेलिसांना कळविण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे.
गडचिराेली : एटापल्ली उपविभागांतर्गत येणाऱ्या भामरागड व एटापल्ली तालुक्यातील २४४ गावांमध्ये पाेलीस पाटलाची पदे भरण्यासाठी जाहीरात काढण्यात आली हाेती. मात्र केवळ १८ गावांना पाेलीस पाटील मिळाले आहेत. पुन्हा तब्बल २२६ जागा रिक्त आहेत. शासनाकडून मासिक जवळपास सहा हजार रूपये मानधन दिले जात असतानाही अर्ज का आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. गावातील स्थिती पाेलिसांना कळविण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक गावात पाेलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. यासाठी गावातीलच व्यक्तीची नेमणूक केली जाते. आपली कामे सांभाळून पाेलीस पाटील पदाची सहज जबाबदारी सांभाळता येते. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठीसुद्धा गावात फार माेठी स्पर्धा राहत असल्याचे दिसून येते. मात्र याला एटापल्ली उपविभाग याला अपवाद ठरला असल्याचे दिसून येते.
एटापल्ली तालुक्यात १४२ व भामरागड तालुक्यात १०२ अशा एकुण २४४ पोलीस पाटलांची पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात पुरेस अर्ज प्राप्त न झाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र याचा फारसा फरक पडला नाही. एटापल्ली तालुक्यात १४२ जागांसाठी केवळ ७१ अर्ज पात्र झाले. ४८ जागा महिलांकरिता राखीव हाेत्या. केवळ ९ महिलांनी अर्ज केले. ९ पैकी २ महीला उत्तीर्ण हाेऊन पोलीस पाटील बनल्या.
भामरागड तालुक्यात १०२ जागांसाठी फक्त २६ अर्ज आले, यापैकी २४ अर्ज पात्र ठरले. २४ पैकी फक्त ०५ पास झाले. ०४ महिलांनी परीक्षा दिली. परंतु चारही महीला नापास झाल्या.
८१ पैकी केवळ २ महिला पाेलीस पाटील
- एटापल्ली तालुक्यात महिला पाेलीस पाटील पदासाठी ४८ जागा हाेत्या. त्यासाठी केवळ ९ महिलांनी अर्ज केले. ९ पैकी २ महिला उत्तीर्ण हाेऊन पोलीस पाटील बनल्या. भामरागड तालुक्यात एकूण ३३ जागा महिलांसाठी राखीव हाेत्या. केवळी चारच अर्ज प्राप्त झाले. या चारही महिला अनुत्तीर्ण झाल्या. त्यामुळे या तालुक्यातील महिलांची सर्वच पदे रिक्त आहेत.
- दुर्गम भागातील नागरिकांकडे दाखले राहत नाही. त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही. तर काही उमेदवार परीक्षा उत्तीर्ण हाेऊ शकले नाहीत. मात्र काही गावांमध्ये अर्जच आले नाही. भरती प्रक्रिया राबवूनही सुमारे २२६ गावांमधील पाेलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. नेमक्या काेणत्या कारणामुळे नागरिक पाेलीस पाटील पदासाठी अर्ज करत नाही, त्याचा शाेध घेण्याची गरज आहे.