जिल्ह्यात केवळ १९ टक्के धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:19 AM2019-07-20T00:19:29+5:302019-07-20T00:20:06+5:30

गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड दरवर्षी केली जाते. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अर्धाच पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाल्याची माहिती आहे.

Only 19 percent of the district's paddy plantation | जिल्ह्यात केवळ १९ टक्के धान रोवणी

जिल्ह्यात केवळ १९ टक्के धान रोवणी

Next
ठळक मुद्देदुष्काळाची छाया गडद : अपेक्षेपेक्षा पावसाची सरासरी निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड दरवर्षी केली जाते. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अर्धाच पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाल्याची माहिती आहे. दमदार पाऊस होत नसल्याने जिल्हाभरातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात धानाचे एकूण क्षेत्र १ लाख ५३ हजार ९६२ हेक्टर इतके आहे. धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर इतके आहे. यापैकी केवळ १० हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावर भात नर्सरी म्हणजेच पऱ्हे टाकण्याचे काम झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोटारपंप, शेततळे व इतर सिंचन सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांनी काही क्षेत्रात धान पिकाच्या रोवणीचे काम केले आहे.
आतापर्यंत जिल्हाभरात केवळ २ हजार ६९ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी झाली आहे. १९ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकल्या आहे. रोवणी व आवत्या मिळून आतापर्यंत २९ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड झाली आहे. १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाली आहे. गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून केवळ ७.४९ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड झाली आहे. कुरखेडा तालुक्यात ११.९१ टक्के, आरमोरी ३८.२८, चामोर्शी ८.५७, सिरोंचा १८.६२, अहेरी ४६.६२, एटापल्ली २४.३२, धानोरा २२.०७, कोरची २६.७६, देसाईगंज ६.४१, मुलचेरा ९.४७ व भामरागड तालुक्यात २२.७९ टक्के धान लागवड झाली आहे.
दरवर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसतो. या महिन्यात नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याच्या प्रवाहाने भरून जातात. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहेत. २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही धानपिकाचे पºहे टाकले नाही. पावसाअभावी धान पिकाची पेरणी, रोवणी व इतर कामे लांबणीवर पडली आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली असून सर्वसामान्य शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत सापडणार आहेत.

४ हजार ७४१ हेक्टरवर तूर
वावरी शेतजमिनीत जिल्ह्यातील शेतकरी तूर पिकाची पेरणी करतात. तसेच दरवर्षी खरीप हंगामात धान पिकाच्या शेतीत बांधावर पाळे टाकून तूर पिकाची लागवड केली जाते. जिल्हाभरात एकूण ४ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर यंदा तूर पिकाची लागवड झाली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ७८० हेक्टर कुरखेडा ७३६ हेक्टर, आरमोरी ८८० हेक्टर, चामोर्शी १ हजार २२४ हेक्टर, सिरोंचा ११ हेक्टर, अहेरी १४३ हेक्टर, एटापल्ली ३७ हेक्टर, धानोरा ४५ हेक्टर, कोरची २० हेक्टर, देसाईगंज ४९९ हेक्टर, मुलचेरा ७० हेक्टर व भामरागड तालुक्यात १० हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली आहे.

१ हजार ६६७ हेक्टरवर मका पीक
गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण १ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर यंदा मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. अहेरी तालुक्यात सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी मका पिकाकडे वळले आहे.

४ हजार ७५ हेक्टरवर सोयाबिन
बाराही तालुके मिळून जिल्हाभरात एकूण ४ हजार ७५ हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकाची लागवड करण्यात आली आहे. सोयाबिनची शेती कमी खर्चाची असून परवडणारी असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत.

४ हजार ७१६ हेक्टरवर कापूस
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना धानपिकासोबतच इतर पिकांच्या लागवडीबाबत सातत्याने मार्गदर्शन होत असल्याने शेतकरी आता बहुपीक घेणे सुरू केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा आतापर्यंत ४ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. यामध्ये सिरोंचा तालुका आघाडीवर आहे.

Web Title: Only 19 percent of the district's paddy plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती