केवळ ३० टक्केच शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:50+5:302021-02-08T04:31:50+5:30
गडचिराेली : बिगर आदिवासी क्षेत्रात आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत शासनाने मार्केटिंग फेडरेशन या अभिकर्ता संस्थेची निवड केली आहे. परंतु ...
गडचिराेली : बिगर आदिवासी क्षेत्रात आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत शासनाने मार्केटिंग फेडरेशन या अभिकर्ता संस्थेची निवड केली आहे. परंतु या अभिकर्ता संस्थेचे धान खरेदी केंद्र बंद असल्याने गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेले गडचिरोली तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या धान विक्रीचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
फेडरेशनने बंद असलेले धान खरेदी तातडीने सुरू करून शेतकऱ्यांची समस्या दूर करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चंद्रशेखर भडांगे यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गडचिरोली तालुक्यातील २ हजार ९०३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून यापैकी केवळ ३० टक्केच शेतकरी वर्गाकडून मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी केली आहे. मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदीसाठी खरेदी विक्री संस्था चामोर्शी व सहकारी भात गिरणी घोट या संस्थेची नेमणूक केली आहे. परंतू या धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी गोदाम भरल्याचे कारण सांगून धान खरेदी बंद केली आहे. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून धानाला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी मार्केटिंग फेडरेशनकडे धान विक्रीसाठी नेतात. परंतु फेडरेशनचे धान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी गडचिरोेेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चंद्रशेखर भडांगे यांनी केली आहे.