रेगडीच्या कन्नमवार जलाशयात केवळ ३५ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:07+5:302021-07-30T04:38:07+5:30
यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत कमी अधिक ...
यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने धानाची लागवड रोवणी सुरू झाली. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न पडल्याने २९ जुलै रोजी धरणात केवळ ३५ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला. मागील वर्षी हा जलसाठा ४२.११ टक्के इतका होता. दरम्यानच्या कालावधीत पाणलोट क्षेत्रात पावसाने झोडपले. त्यामुळे १८ जुलै २०२० रोजी जलाशय १०० टक्के भरले होते. यावर्षी आतापर्यंत नवेगाव येथे ४२१ मिमी, घोट ४९६ मिमी, चामोर्शी ३५८ मिमी, रेगडी ५३१ मिमी, तर भेंडाळा येथे ६७९ मिमी. पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पाऊस चामोर्शीत पडला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.
बाॅक्स :
जलाशय पातळीत वाढ नाही
जलाशयात अद्याप वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट असून, तालुक्यात हा एकमेव जलाशय आहे. उर्वरित मामा तलाव आहेत. त्यावरच अवलंबून राहावे लागत असून, अद्याप तलाव ही पाण्याची पातळी ओलांडू शकले नाहीत. त्यामुळे चिंता वाढली आहे. तालुक्यातील बरीचशी शेती निसर्गावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा निसर्गाच्या पावसाकडे लागून आहेत. जलाशय क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडत नसल्याने जलाशय पातळीत वाढ होऊ शकली नाही. रोवणी शेवटच्या टप्प्यात आहे. यासाठी पुढील काळात ही जलाशये पाण्याची पातळी गाठणे आवश्यक आहे.
काेट
सिंचन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. एच. घोलपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मागील वर्षी या कालावधीत पाऊस नसल्याने जलाशय पातळीत वाढ झाली नव्हती. त्यासाठी मागील वर्षीसुध्दा आगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली होती. यावेळी असेच दिसत आहे. तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.
ए. एच. घोलपे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग