केवळ ५० टक्के धानाची भरडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:03 AM2018-05-10T00:03:48+5:302018-05-10T00:03:48+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

Only 50 percent payback | केवळ ५० टक्के धानाची भरडाई

केवळ ५० टक्के धानाची भरडाई

Next
ठळक मुद्देअडीच लाख क्विंटल धान केंद्रांवरच पडूनदीड लाख क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाकडे जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी २ लाख ४३ हजार ७७८ क्विंटल इतक्या धानाची भरडाई झाली असून या भरडाईची टक्केवारी ५० टक्क्यावर पोहोचली आहे. भरडाईसाठी केंद्रांवरून धानाची उचल करण्यास दिरंगाई होत असल्याने अद्यापही तब्बल २ लाख ५९ हजार ९०४ क्विंटल धान केंद्रावर पडून आहे.
५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानापैकी २ लाख ४६ हजार ७७८ क्विंटल धान भरडाईसाठी महामंडळाच्या वतीने मिलर्सना देण्यात आले. आतापर्यंत २ लाख ४६ हजार ७७८ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. धानाची भरडाई झाल्यानंतर ६७ टक्क्याप्रमाणे तांदूळ येत असतो. त्यानुसार भरडाई झालेल्या एकूण धानामधून १ लाख ६२ हजार ३४१ क्विंटल इतका कच्चा तांदूळ निघाला. यापैकी १ लाख ५१ हजार ६२८ क्विंटल कच्चा तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे जमा आहे, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मिलर्सकडे अद्यापही १३ हजार ७१३ क्विंटल तांदूळ शिल्लक आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ३ लाख ६३ हजार ६५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर अहेरी कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवरून १ लाख ३८ हजार २६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व महामंडळाकडे पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. सध्या उन्हाळा सुरू असूनही वातावरणात बदल घडून अवकाळी पाऊस बरसत आहे. काही दिवसांपूर्वी अहेरी उपविभागात तसेच जिल्ह्याच्या इतर विभागात वादळी पाऊस बरसला. अशाच प्रकारचा पाऊस येत्या काही दिवसात झाल्यास केंद्रांवर असलेल्या धानाची नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरीप हंगामात आविका संस्थांच्या केंद्रांवर धान विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार बोनस देण्याची तरतूद आहे. ५ ते ४९ क्विंटल धान खरेदी धान विक्री केलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल २०० रूपये बोनस आदिवासी विकास महामंडळाकडून दिला जातो.
रबी हंगामाच्या उन्हाळी धानासाठी १४ केंद्रे
कुरखेडा, कोरची, आरमोरी या तीन तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक शेतकरी घेतात. आता उन्हाळी धान पिकाची मळणी सुरू असल्याने महामंडळाने या तीन तालुक्यात १४ धान खरेदी केंद्रे सुरू केले आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील आंधळी, कढोली, कुरखेडा, घाटी, सोनसरी, गेवर्धा, वडेगाव, देऊळगाव, गोठणगाव, कोरची तालुक्यातील बेतकाठी, रामगड, गॅरापत्ती, येंगलखेडा व आरमोरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी केंद्राचा समावेश आहे.

Web Title: Only 50 percent payback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.