गडचिरोलीमध्ये ६६ टक्केच पाऊस, मुसळधार कधी बरसणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 04:24 PM2024-07-02T16:24:21+5:302024-07-02T16:25:12+5:30
केवळ १४४.७ मिमी पावसाची नोंद : शेतकरी सापडले चिंतेत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जून महिना संपला असून या महिन्यात जिल्ह्यात केवळ १४४.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरी जून महिन्यात २१० मिमी पावसाची नोंद करण्यात येते. मात्र यंदा केवळ ६६ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
७ जूनपासून पावसाच्या मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. या नक्षत्रात जिल्ह्यात आठवडाभर पावसाचा थांगपत्ता नव्हता. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस जिल्ह्याच्या काही भागात जोरदार तर काही भागात कमी पडला. या पावसाने खरीप हंगामाच्या धान व इतर पेरणीला सुरुवात झाली. त्यानंतर आर्द्रा नक्षत्र सुरू झाला. या नक्षत्रातही पावसाला जोर नाही.
सिरोंचा व भामरागड तालुक्यात चांगला पाऊस
जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत जेमतेम अर्धाच पाऊस पडला. जिल्ह्यातील काही तालुके वगळता निम्म्याहून अधिक तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. केवळ सिरोंचा तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच २४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भामरागड तालुक्यातही अपेक्षित पाऊस म्हणजे १७९ मिमी पाऊस झाला. याशिवाय काही तालुक्यांमध्ये सामान्य पाऊस झाला आहे. मात्र जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे.
हवामान विभागाचा अंदाज १०० टक्के खरा होईना
यंदा हवामान विभागाने राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या पावसाचे संकेत दिले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाची केली जाब शेतकऱ्यांनी धानासह कापूस, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली. हवामान विभागाकडून दररोजच पावसाचा अंदाज व सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. मात्र हवामान विभागाचा अंदाज १०० टक्के खरा होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.