आत्रामांच्या भाजप प्रवेशाची नुसतीच चर्चा
By admin | Published: April 16, 2017 12:39 AM2017-04-16T00:39:27+5:302017-04-16T00:39:27+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे.
अनेकांचा विरोध : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडे विचारणाही नाही
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे. मात्र भाजपच्या प्रवेशाबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांच्यासह पक्षाच्या एकाही जबाबदार पदाधिकाऱ्याकडे याबाबत पक्षाच्या राज्यस्तरावरून विचारणा झाली नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
भाजपात कुणालाही प्रवेश द्यायचा असेल तर पक्षातील जिल्हास्तरावरील नेत्यांशी विचार विनिमय केला जातो. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले जाते. त्यानंतर संबंधित नेत्याच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला जातो. सध्या गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. यापूर्वीही २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मदतीने सत्ता स्थापन करण्यात आली होती. या दोन्ही सत्ता स्थापनेत धर्मरावबाबा आत्रामांची भूमिका मोलाची होती. मात्र धर्मरावबाबा आत्राम यांनी २०१४ ची निवडणूक अहेरी क्षेत्रातून भाजपच्या विरोधात लढविली आहे. शिवाय गडचिरोली क्षेत्रातही त्यांच्या कन्येने भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली आहे.
सध्या अहेरीच्या राजघराण्यातील राजे अम्ब्रीशराव आत्राम भाजपमध्ये आहेत. त्यांची गोची होऊ नये अशी भाजपची इच्छा आहे. तरीही धर्मरावबाबा आत्राम यांचे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न कसोसीने सुरू आहेत. त्यांनी अलिकडेच संघ मुख्यालयाला भेट देऊन भाजपात प्रवेशाचे संकेत दिले होते. ते भाजपात जाणार ही चर्चा राष्ट्रवादीच्या जि.प. निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सुरू झाली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात सध्या पालकमंत्री अम्ब्रीशराव व धर्मरावबाबा आत्राम या दोन्ही आत्रामांपेक्षा आदिवासी विद्यार्थी संघाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. याची चुनूक जि.प., पं.स. निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी यापूर्वीही अनेक पक्ष बदलले आहेत. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी भाजप प्रवेशाचे दार उघडे करते काय, हे आता पहावे लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत धर्मरावबाबा आत्राम यांची दीर्घ चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. मात्र सध्या तरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळाला याची माहिती नाही. (जिल्हा प्रतिनिधी)