१४ गावांत एकच गणपती विराजमान
By admin | Published: September 8, 2016 01:36 AM2016-09-08T01:36:40+5:302016-09-08T01:36:40+5:30
तालुक्यातील चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ३८ ग्रामपंचायती असून ८७ गावांचा समावेश आहे.
चामोर्शी तालुका : गावांनी घडविले एकतेचे दर्शन
चामोर्शी : तालुक्यातील चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ३८ ग्रामपंचायती असून ८७ गावांचा समावेश आहे. यापैकी यावर्षी १४ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना तंटामुक्त समिती व ग्रामस्थांच्या पुढाकारातून साकारण्यात आली आहे. यानिमित्ताने सार्वजनिक मंडळांकडून गावातील एकतेचे दर्शन होत आहे.
गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखणे, तसेच भांडण-तंट्यांना तारा न देणे या उदात्त हेतूने एक गाव, एक गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एक गाव, एक गणपतीची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, गोपाल ढोरे, मल्ल्हार थोरात, निशा खोब्रागडे, पोलीस हवालदार टिकाराम देशमुख, राजकुमार ढोरे यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.
चामोर्शी नगर पंचायतीच्या क्षेत्रात एकूण १७ वॉर्ड आहेत. चामोर्शी शहराची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास आहे. या शहरात विविध गटातटाचे मंडळ व पदाधिकारी असले तरी आठ ते दहा वॉर्डांमध्ये एकच गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे चामोर्शी शहरातही एकात्मतेच्या भावनेला चालना मिळण्यास मदत झाली आहे. अनेक मंडळांतर्फे सामाजिक उपक्रमही राबविले जात आहे. (शहर प्रतिनिधी)