जिल्ह्यातील एकमेव पेपरमिल उद्योग गुंडाळण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:40+5:302021-09-22T04:40:40+5:30

आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आष्टी-इल्लूर येथे असलेली पेपरमिल २०१६पासून बंद पडलेली आहे. पाच वर्षांपासून उत्पादन बंद ...

The only papermill industry in the district is preparing to wind down | जिल्ह्यातील एकमेव पेपरमिल उद्योग गुंडाळण्याच्या तयारीत

जिल्ह्यातील एकमेव पेपरमिल उद्योग गुंडाळण्याच्या तयारीत

Next

आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आष्टी-इल्लूर येथे असलेली पेपरमिल २०१६पासून बंद पडलेली आहे. पाच वर्षांपासून उत्पादन बंद असताना आता हळूहळू काही मशिनरी बल्लारपूर येथील पेपरमिलमध्ये स्थानांतरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही पेपर मिल पुन्हा सुरू न करता येथील युनिट गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येते. आधीच उद्योगधंद्याची मारामार असलेल्या या जिल्ह्यात यामुळे कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

सध्या हे युनिट बंद असल्याने बऱ्याच रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले, तर स्थायी कामगारांना बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. बी.जी.पी.एल. युनिट आष्टी येथे ए-४ साइज पेपर कटिंग मशीन ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही कर्मचारी या ठिकाणी काम करीत होते. आता ती मशीनही स्थलांतरित करण्यात आल्याने पेपर मिल कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

आष्टी येथे १९८७ मध्ये एकमेव पेपरमिल उद्योग सुरू झाला होता. पेपरमिल कंपनीने आष्टी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने ताब्यात घेऊन स्थायी नोकरी देण्याच्या करारनाम्यावर विकत घेतल्या. परंतु जमिनी दिलेल्या स्थानिकांना अस्थायी नोकरी दिली. आता अस्थायी कामगारांना वेठीस धरून हळूहळू मिल बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

(बॉक्स)

उद्योगामुळे बाजारपेठेस होती भरभराट

आष्टी येथे पेपरमिल उभारली गेली तेव्हा येथील मार्केट चांगले तेजीत होते. या पेपरमिल मध्ये काम करणारे कामगार आष्टी येथील बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात खरेदी करीत होते. आष्टी गावाची या पेपरमिलमुळे एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. आता पेपर मिल बंद केल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, अनेकांना अप्रत्यक्षपणे मिळालेला रोजगारही गेला आहे.

(बॉक्स)

बल्लारपूर पेपरमिलमध्ये सामावून घ्या

आष्टीचे युनिट कायमस्वरूपी बंद केले जाणार असल्यास या युनिटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बल्लारपूर पेपरमिल मध्ये सामावून घेण्यात यावे किंवा येथील कामगारांना स्वेच्छानिवृत्तीच्या नियमाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. त्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यामार्फत शासनाकडे निवेदनही दिले. त्यावर आता निर्णय होतो याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The only papermill industry in the district is preparing to wind down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.