५२ वर्षांत लढल्या फक्त दोन महिला उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:00 AM2019-03-24T01:00:18+5:302019-03-24T01:00:53+5:30
महिलांनी आता सर्वच क्षेत्र व्यापले असले तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. या मतदार संघात गेल्या ५२ वर्षात झालेल्या १३ निवडणुकांमध्ये केवळ २ महिला उमेदवारांनी निवडणूक लढली.
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : महिलांनी आता सर्वच क्षेत्र व्यापले असले तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. या मतदार संघात गेल्या ५२ वर्षात झालेल्या १३ निवडणुकांमध्ये केवळ २ महिला उमेदवारांनी निवडणूक लढली. त्यांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागले. एकीकडे जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये सरपंचपदी महिला असताना देशाचा कारभार चालविणाऱ्या संसदेचे प्रतिनिधीत्व एकदाही महिलेकडे येऊ नये? असा प्रश्न सहज पडल्याशिवाय राहात नाही.
२००९ मध्ये चिमूर लोकसभा मतदार संघाचे नाव गडचिरोली-चिमूर मतदार संघ असे झाले. सन १९८० ला झालेल्या लोकसभेच्या सातव्या निवडणुकीत चिमूर लोकसभा मतदारसंघातून एकूण ९ उमेदवार रिंगणात होते. हे वर्ष चिमूर क्षेत्राच्या इतिहासात ऐतिहासिक ठरले. चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेनंतर (स्थापना १९६७) प्रथमच एक महिला उमेदवार निवडणूक लढण्यास मैदानात उतरली होती. त्या होत्या चंद्रकला किसन जांभुळकर. विशेष म्हणजे त्यांनी अपक्षपणे ही निवडणूक लढली. पण त्यांना अवघी ३३९७ मते मिळाली. एकूण उमेदवारांमध्ये त्या सातव्या क्रमांकावर राहून पराभूत झाल्या. त्यावेळी या मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विलास मुत्तेमवार विजयी झाले होते. त्यानंतर १९९१ च्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत चिमूर मतदारसंघात प्रथमच सर्वात जास्त २१ उमेदवार खासदार बनण्यासाठी निवडणुकीत उतरले. त्यात दमयंतीबाई महादेवराव सोनेकुसरे या एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यासुद्धा अपक्ष लढल्या. यावेळी मतांचे प्रमाण आणखी घसरले आणि जेमतेम १६५ मते मिळाली. आजपर्यंत या मतदार संघात एकूण १४७ उमेदवारांनी खासदारकीचे स्वप्न पाहात निवडणूक लढली. १४७ पुरूष उमेदवार होते.
२८ वर्षांपासून महिला उमेदवार गायब
आधीचा चिमूर लोकसभा मतदारसंघ (सन १९६७ ते सन २००९) आणि आताचा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ (२००९ पासून आतापर्यंत) यात आतापर्यंत १३ लोकसभा निवडणुका होऊन १३ खासदार झाले. सन २००९ पासून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर चिमूरचे नाव बदलून झालेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदार झाले. परंतू १९९१ च्या दहाव्या लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत गेल्या २८ वर्षात एकही महिला उमेदवार या मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात उतरली नाही. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाने महिला उमेदवारांना या मतदार संघात संधी दिली नाही.