खुल्या जागांचे रूप पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:04 PM2018-04-04T23:04:20+5:302018-04-04T23:04:20+5:30
गडचिरोली शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे ओपन स्पेसचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे ओपन स्पेसचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.
गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी ओपन स्पेस सोडण्यात आले आहे. मात्र या ओपन स्पेसचा नगर परिषदेने विकास केला नाही. त्यामुळे काही ओपन स्पेसवर नागरिकांनी अतिक्रमण करून ती बळकाविली तर काही ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात असल्याने त्या ओपन स्पेसला डम्पिंग यॉर्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे. फुलांची झाडे दिसण्याऐवजी गवत व झुडूपे वाढली आहेत. दिवसभर ओपन स्पेसमध्ये डुकरांचा हैदोस राहत असल्याने सभोवतालचे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी होत होती.
राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. यामध्ये आरमोरी मार्गावरील नरेश हेमके यांच्या घराजवळील खुल्या जागेचा विकास करून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर कारमेल शाळेजवळील पठाण यांच्या घरामागील ओपन स्पेस, लांझेडा येथील श्री समर्थ यांच्या घराजवळील जागा, डॉ. कामळी हॉस्पिटल जवळील डांगे यांच्या घरासमोरील जागा, चामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार यांच्या ले-आऊटमधील जागा, शाहू नगरातील तामसेटवार यांच्या घराजवळील खुली जागा, गुहे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, विसापूर मार्गावरील भोयर यांच्या घराजवळील जागा, मिल्ट्री कॅम्पलगत उईके यांच्या घराजवळची जागा, आयटीआय चौकातील नगर परिषद संकुलजवळच्या दोन खुल्या जागा, झाशी राणी नगरातील वर्षा बट्टे यांच्या घरासमोरची खुली जागा, चामोर्शी मार्गावरील जंगल कामगार सोसायटीजवळची खुली जागा, हेडगेवार चौैकातील महादेव मेश्राम, शिवाजी महाविद्यालयामागील खुली जागा, फाले व वाळके यांच्या घरामागील खुली जागा, होंडा शो रूमजवळील सोरते व बन्सोड यांच्या जवळची खुली जागा, खांडरे व मुरस्कर यांच्या घराजवळील खुली जागा, कन्नमवार नगरातील मेश्राम यांच्या घराजवळील खुली जागा, मुख्याधिकारी निवासस्थानाजवळची जागा, चामोर्शी मार्गावरील पाराशर, म्हशाखेत्री यांच्या घराजवळील जागा, रामदास कायरकर यांच्या घराजवळची जागा, शिक्षक कॉलनीमधील काथवटे यांच्या घराजवळची जागा, पंचवटी नगरातील धाईत यांच्या घराजवळील खुल्या जागेचा विकास केला जाणार आहे.
प्रत्येक खुल्या जागेच्या विकासासाठी जवळपास २५ लाख ते १५ लाख रूपयापर्यंतचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.