ओपन स्पेस बनले माेकाट जनावरांचे कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:24+5:302021-04-02T04:38:24+5:30
गडचिराेली : स्थानिक कॅम्प एरियातील नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या ओपन स्पेसमध्ये माेकाट जनावरे शिरून तेथील गवतावर ...
गडचिराेली : स्थानिक कॅम्प एरियातील नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या ओपन स्पेसमध्ये माेकाट जनावरे शिरून तेथील गवतावर ताव मारतात. त्यामुळे ओपन स्पेसचे अस्तित्व धाेक्यात आले आहे.
नगर परिषदेने एक वर्षापूर्वी या ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत बांधून मध्यभागी ऑस्ट्रेलियन गवत लावले आहे. त्यामुळे हे ओपन स्पेस परिसरातील ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी विरंगुळ्याचे केंद्र बनले आहे. या ओपन स्पेसला चार बाजूने चार दरवाजे ठेवण्यात आले आहेत. ओपन स्पेसमध्ये प्रवेश केल्यानंतर व बाहेर जातेवेळी दरवाजा लावणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. मात्र काही नागरिक दरवाजा न लावताच बाहेर पडतात. त्यामुळे दरवाजा उघडा राहून त्यातून माेकाट जनावरे शिरतात. दर दिवशी तीन ते चार जनावरे या ठिकाणच्या ऑस्ट्रेलियन गवतावर ताव मारतात. तसेच इतर झाडेही नष्ट केली आहेत. काही सुजाण नागरिकांनी दरवाजांना कुलूप लावून एकच दरवाजा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नागरिकांनी त्याला विराेध केला. नगर परिषदेने स्वत: निर्णय घेऊन काेणताही एकच दरवाजा सुरू ठेवावा. उर्वरित दरवाजे कुलूपबंद केल्यास माेकाट जनावरांवर नियंत्रण ठेवणे शक्य हाेईल. अन्यथा लाखाे रुपये खर्चून तयार करण्यात आलेले ओपन स्पेस काही दिवसातच नष्ट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत वाॅर्डातील ज्येष्ठ नागरिक एस.आर.काळे, व्ही.एम.भिवापुरे यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन सूचना केल्या आहेत.
बाॅक्स....
ताेटी नसल्याने पाण्याचा अपव्यय
ओपन स्पेसमधील गवत व इतर फुलझाडांना पाणी देण्यासाठी नगर परिषदेने नळ बसविले आहे. मात्र या नळाला ताेटी नाही. तसेच पाणी टाकण्यासाठी एकाही कर्मचाऱ्याची नियुक्ती नगर परिषदेने केली नाही. त्यामुळे नळाचे पाणी वाहत राहते. काही ठराविक जागेत पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्या ठिकाणचे गवत कुजण्याचा धाेका आहे. तर दूरच्या गवताला पाणी मिळत नसल्याने ते पाण्याअभावी करपण्याचा धाेका आहे.