आयटीआय कार्यशाळा व इमारतीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:21 AM2019-02-02T01:21:34+5:302019-02-02T01:22:12+5:30
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष संगीता गाडगे, विशेष अतिथी म्हणून केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, राज्य आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूरचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी, तहसीलदार कैलास अंडील, उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रकल्प अधिकारी नीरज मोरे उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावी. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा व प्रशिक्षण पूर्ण करावे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी नक्कीच मिळेल, असा आशावाद पालकमंत्र्यानी व्यक्त केला.
भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराविषयी प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच अन्य ठिकाणी तालुकास्तरावर जावे लागत होते. परंतु आता येथे प्रशिक्षणासाठी कार्यशाळा व प्रशासकीय इमारत झाल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना येथे प्रवेश घेता येईल. अनेक वर्षांपासून मिळालेल्या या संधीचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोनकुवर, संचालन प्रा.संतोष डाखरे, तर आभार प्राचार्य एस.बी.सत्तारी यांनी मानले.