आधारभूत खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:43 AM2018-05-24T00:43:58+5:302018-05-24T00:43:58+5:30
तालुक्यातील कुरंडी माल येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. येथे गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवावी लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील कुरंडी माल येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. येथे गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवावी लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने कुरंडी माल येथे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर जवळपास २ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. परंतु येथे संस्थेचे गोडाऊन नसल्याने संपूर्ण धानाचे पोते खुल्या जागेतच उघड्यावरच ठेवावे लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु धानाची उचल अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे धान भिजण्याची शक्यता आहे. यात शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने तत्काळ धानाची उचल करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनुसूचित जमाती विभाग काँग्रेसच्या वतीने गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
धानाच्या पाहणीप्रसंगी नरेंद्र गजभिये, सरपंच टिकेश कुमरे, दिलीप घोडाम, यशवंत गेडाम, बाबुराव मडावी, रसुला भोडे, योगाजी हिचामी, किसन कुलसंगे, विठ्ठल टेंभुर्णे, वैैशाली गेडाम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.