सहकारी संस्थांचे धान उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:51 PM2018-06-12T23:51:14+5:302018-06-12T23:51:14+5:30
तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केली नाही. सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले असल्याने हे धान पावसाने भिजून खराब होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केली नाही. सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले असल्याने हे धान पावसाने भिजून खराब होण्याची शक्यता आहे. धानाची उचल करावी, अशी मागणी कुरखेडा पंचायत समितीचे सभापती गिरीधारी तितराम यांनी केली आहे.
आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी धान खरेदी केले. मात्र काही संस्थांकडे गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे धान उघड्यावर ठेवावे लागत आहे. संस्थांनी धान खरेदी केल्यानंतर सदर धान उचलण्याची जबाबदारी आदिवासी विकास महामंडळाची आहे. पावसाळ्यापूर्वी धान उचलणे आवश्यक होते. मात्र पावसाला सुरूवात होऊनही काही संस्थांचे धान उचलले नाही. चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे धानाची उचल करण्यात आली नव्हती. त्यामुळे लाखो क्विंटल धान सडले होते. धानाची दुर्गंधी येत होती. यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. यावर्षीही धानाची उचल न केल्यास पावसाने धान भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन धानाची उचल करावी, अशी मागणी गिरीधारी तितराम यांनी केली आहे.
ताडपत्री झाकून धान ठेवण्यात आले आहे. मात्र ही केवळ तात्पुरती सोय आहे. ताडपत्रीमधून पाणी शिरून धानाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धानाची उचल करणे आवश्यक आहे.