अंबेझरावासीयांनी गाव सोडण्यास दर्शविला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:14 PM2017-10-29T23:14:50+5:302017-10-29T23:15:14+5:30
अहेरी तालुक्यातील अंबेझरा हे गाव अभयारण्यांतर्गत येत असल्याने या गावातील नागरिकांनी दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी तालुक्यातील अंबेझरा हे गाव अभयारण्यांतर्गत येत असल्याने या गावातील नागरिकांनी दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे, यासाठी वन विभागाने रेटा चालविला आहे. मात्र गावातील नागरिकांनी गाव सोडून जाण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
अंबेझरा हे गाव लखामेंढा पाहडीनंतर ६ किमी अंतरावर आहे. या गावाला येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम, संतोष मडावी यांनी शनिवारी गावकºयांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. अंबेझरा गाव अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्याने सदर गाव सोडून जावे, असा ससेमिरा वन विभागाच्या कर्मचाºयांनी लावला आहे.
अंबेझरा गावाला पेसा कायद्यांतर्गत तसेच वनाधिकार कायद्यानुसार जमीन मिळाली आहे. अनेकांकडे वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जमीन सुपीक असल्याने शेतीतील उत्पन्नाच्या भरवशावर येथील नागरिक जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत गाव सोडून जाणे शक्य नाही. वन विभागाने कोणतेही कारवाई केले तरी आपण गाव सोडणार नाही, असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे. पेसा कायद्यांतर्गत गावासभोवतालच्या जल, जमीन व जंगलावर स्थानिक नागरिकांचा अधिकार आहे. सदर अधिकार राज्यघटनेने बहाल केला आहे. त्यामुळे वन विभाग तर सोडाच सरकार सुध्दा गावातून हटवू शकणार नाही, असा सल्ला बालाजी गावडे यांनी दिला आहे.