तंत्रज्ञानाच्या युगात तरूणांना विकासाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 01:33 AM2017-01-02T01:33:25+5:302017-01-02T01:33:25+5:30
जगात भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात तरूणांना
शिवाजी बोडखे यांचे प्रतिपादन : कारवाफात युवा महोत्सवाचे उद्घाटन
गडचिरोली : जगात भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात तरूणांना विकासाची चांगली संधी आहे. तरूण पिढीच्या भरवशावरच या देशाची वाटचाल विकसित देशाकडे होत आहे. यात पुणे, मुंबई, नागपूर येथील तरूणांसोबतच गडचिरोलीतील तरूणांचासुद्धा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. गडचिरोलीतील तरूणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी सदर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून तरूणांनी स्वत:चा विकास करावा, असे प्रतिपादन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी केले.
धानोरा तालुक्याच्या कारवाफा येथे ‘महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे’ निमित्त पोलीस विभागातर्फे आयोजित युवा महोत्सव २०१७ चे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, विस्तार अधिकारी वामन सावसाकडे, मिस हेरिटेज इंटनॅशनल २०१४ च्या विजेत्या अभिनेत्री शीतल उपरे, जि. प. सदस्य शांता परसे, कारवाफाच्या सरपंच प्रेमिला कुमरे, पोलीस पाटील रायपुरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक बोडखे म्हणाले, सदर युवा महोत्सव १२ दिवस चालणार असून येथे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. बँकेत खाते उघडण्याची सोय या मेळाव्यात करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी आपले बचत खाते काढून कॅशलेस व्यवहाराचे ज्ञान आत्मसात करावे. तसेच डिजिटल इंडिया ही संकल्पना राबविण्यासाठी डिजिटलायझेशनचे महत्त्व जाणून घ्यावे, गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम असला तरी तरूग्णांचा उत्साह पाहून जगाच्या नकाशावर नक्कीच हा जिल्हा प्रगतीपथावर जाऊ शकतो, त्यासाठी युवकांचे योगदान यात आवश्यक आहे, असेही बोडखे यावेळी म्हणाले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, सदर युवा महोत्सवाच्या माध्यमातून तरूणांना करिअरच्या संधी जाणून घेण्याची पर्वणी आहे. पोलीस विभाग केवळ एक साधन आहे. आत्मविश्वासाच्या बळावरच जिल्ह्यातील युवक पुढे जाऊ शकतात. त्यामुळे मोठे होण्यासाठी स्वप्न बघा, शासनाच्या विविध योजना तुमच्या भविष्यासाठी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्या, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात कारवाफातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, संचालन पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंघ यांनी केले तर आभार शशिकांत लोंढे यांनी मानले.
गडचिरोलीत प्रचंड गुणवत्ता- शीतल उपरे
४अभिनेत्री शीतल उपरे मार्गदर्शन करताना म्हणाल्या, येथील आदिवासी तरूण- तरूणींनी जे नृत्य या मेळाव्यात सादर केले ते अप्रतिम आहे. गडचिरोलीत एवढी गुणवत्ता असू शकते, याची कल्पनासुद्धा केली नव्हती. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नकारात्मक बाबी सकारात्मक कशा करता येतील, याचा विचार करून वाटचाल करा. ध्येय मोठे ठेवून त्या दिशेने मार्गक्रमण करा, यासाठी केवळ स्वत:वर विश्वास ठेवा. करिअर करण्यासाठी येथील तरूण- तरूणींनी नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी व प्रसार माध्यमाचे क्षेत्र आदी गोष्टींमध्ये तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
अभ्यासिका कक्ष, फिरते वाचनालयाची सुविधा
४सदर युवा महोत्सवादरम्यान कारवाफा येथे ज्ञानगंगा अभ्यासिका कक्ष, फिरते वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे युवक-युवती व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे होणार आहे.