भेंडाळा भागात अनेक प्रस्थापितांना डच्चू, तर तरुणांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:28+5:302021-01-25T04:37:28+5:30
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील दुसऱ्या टप्प्याच्या ग्रामपंचायतीचा निकाल २२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये भेंडाळा परिसरात अनेक प्रस्थापितांना ...
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील दुसऱ्या टप्प्याच्या ग्रामपंचायतीचा निकाल २२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये भेंडाळा परिसरात अनेक प्रस्थापितांना पराभव पत्करावा लागला, तर बहुतांश ठिकाणी नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
भेंडाळा ग्रामपंचायत निकालात प्रभाग क्र.१ मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात निखिल उंदीरवाडे, गीता तुंबडे, विठ्ठल सातपुते निवडून आले. प्रभाग क्र. २ मध्ये माजी सरपंचांसह २ सदस्य दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले होते. यात माजी सरपंचांना पराभव पत्करावा लागला, तर कुंदा नरेंद्र जुवारे, संजय चलाख या माजी सदस्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. या प्रभागातून नंदेश्वर हा नवीन चेहरा निवडून आला. प्रभाग क्र. ३ मधून सर्वांना धक्का देणारा निकाल हाती आला. यात माजी तंमुस अध्यक्ष गुरुदेव डांगे, वर्षा सातपुते, कुसुम उंदीरवाडे यांचा एकतर्फी विजय झाला.
फोकुर्डी ग्रामपंचायतमध्ये नरेंद्र फाले यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली गेली. यामध्ये त्यांना घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या शेतकरी-शेतमजूर-युवा आघाडीचे ७ पैकी ६ सदस्य विजयी झाले. यात नरेंद्र फाले, भावना गाडमोडे, तुमदेव दहेलकर, मीनाक्षी लोडेलवार, मनीषा बावणे, रूपाली दहेलकर या विजयी झाल्या.
रामाळा ग्रा. पं. च्या निवडणुकीत अतुल भिरकुरवार यांच्या आघाडीचे ७ सदस्य निवडून आले. घारगाव ग्रा. पं. मध्ये जिल्हा परिषद सदस्या कविता भगत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्यात आली. संपूर्ण आघाडी निवडून आली. यामध्ये माजी सरपंचांसह नवीन तरुण मंडळींना संधी देण्यात आली. दोटकुली ग्रा. पं. मध्ये चुरस बघायला मिळाली. दोन्ही गटाचे प्रत्येकी तीन-तीन सदस्य निवडून आले. वाघोली ग्रा. पं. चा निकाल संमिश्र लागला.
वेलतूर तुकूम ग्रा. पं. मध्ये दिगंबर धानोरकर यांच्या नेतृत्वात गावविकास आघाडीने ७ पैकी ६ जागांवर यश प्राप्त करून वर्चस्व स्थापन केलेे.
मोहुर्ली ग्रा. पं. मध्ये हनुमान पार्टी आघाडीला ४ जागा, तर वाल्मीकी गटाला ३ जागा, मुरखळा माल ग्रा. पं.मध्ये भास्कर बुरे गटाला ८ जागा, तर इतर १ जागा, नवेगाव माल ग्रा. पं. मध्ये परिवर्तन आघाडीला ६ जागा, तर ग्रामविकास आघाडीला १ जागा. निवडून आलेल्या सर्व सदस्याचे शांततेत स्वागत करण्यात आले. आता सर्वांचे लक्ष सरपंचांच्या आरक्षणाकडे लागले आहे. भेंडाळा परिसरातील अनेक ग्रामपंचायतींवर अनेक गटांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.