नक्षल सप्ताहादरम्यान बंदला वाढतोय गावकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:22 AM2018-08-01T01:22:26+5:302018-08-01T01:23:10+5:30

जिल्ह्यात सलग दुसऱ्याही वर्षी नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या शहीद सप्ताहादरम्यान त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. अनेक ठिकाणी नक्षली बॅनर जाळून नागरिक आपला उघड विरोध प्रकट करताना दिसत आहेत.

Opposition of the villagers is increasing during the Naxal Week | नक्षल सप्ताहादरम्यान बंदला वाढतोय गावकऱ्यांचा विरोध

नक्षल सप्ताहादरम्यान बंदला वाढतोय गावकऱ्यांचा विरोध

Next
ठळक मुद्देदहशतमुक्त वातावरणाचा पोलिसांचा प्रयत्न : अतिसंवेदनशिल क्षेत्रातही नक्षलींना मिळेना प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/घोट : जिल्ह्यात सलग दुसऱ्याही वर्षी नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या शहीद सप्ताहादरम्यान त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. अनेक ठिकाणी नक्षली बॅनर जाळून नागरिक आपला उघड विरोध प्रकट करताना दिसत आहेत.
दि.२८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षल शहीद सप्ताह पाळला जात आहे. पोलीस आणि सरकारविरोधात आवाहन करणारे बॅनर आणि पत्रके लावून नक्षलवाद्यांकडून काही ठिकाणी नागरिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र या बंदला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवत नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी नागरिकही आपल्या मनात खदखदत असलेला असंतोष बाहेर काढून नक्षलींविरूद्ध नारेबाजी करून बॅनरची होळी करत आहेत. कारवाफा उपविभागांतर्गत पोलीस मदत केंद्र गट्टा (फु) येथील शालेय विद्यार्थी व नागरिकांनी नक्षल बंदला कंटाळून निषेध मोर्चा काढला. पोलीस मदत केंद्र जावाबंडी हद्दीत नक्षलवाद्यांनी जंगलात लावलेल्या बॅनरची स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन होळी केली.
कोठरीवासीयांनी घेतली मदत न करण्याची प्रतिज्ञा
घोट परिसरातील कोठरी येथे ३० नोव्हेंबर २०१० रोजी रात्री नक्षलवाद्यांनी बिरसू चुक्का पोटावी याला त्याच्या घरातून नेऊन काठ्यांनी बेदम मारहाण करून आणि नंतर बंदुकीची गोळी घालून त्याची निर्घृण हत्या केली होती. त्याच्या मृत्यूची धग आजही गावकऱ्यांच्या मनात कायम आहे. बिरसुची आई मुलाची आठवण काढून रडते. यावेळच्या नक्षल बंदच्या निमित्ताने त्याला विरोध दर्शविण्यासाठी कोठरीच्या गावकºयांनी आपल्या गावपुत्राचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून बिरसूचे स्मारक बांधले व त्याला श्रद्धांजली वाहिली. बिरसूचे स्मारक बांधल्यानंतर स्मारकाची पुजा करून नक्षलविरोधी घोषणाही दिल्या. नक्षल्यांमुळे आपल्या गावाचा विकास होत नाही. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. त्यामुळे नक्षल्यांना व त्यांच्याकडून होणाºया विकास कामातील अडथळ्यांना विरोध करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

Web Title: Opposition of the villagers is increasing during the Naxal Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.