धान उत्पादक जिल्ह्यात बहरली फळबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:30+5:302021-02-24T04:37:30+5:30
आरमोरी : धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली किंवा लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात पेरू आणि केळींच्या बाग फुलवून उत्पन्नाचा ...
आरमोरी : धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली किंवा लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात पेरू आणि केळींच्या बाग फुलवून उत्पन्नाचा नवा स्रोत दाखविण्याचे काम एका शेतकऱ्याने केले आहे. विशेष म्हणजे हे शेतकरी स्थानिक नसून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपरखेडचे रहिवासी आहेत.
पिंपरखेड येथील मारुती निवृत्ती लाड या शेतकऱ्याने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातून सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदी किनाऱ्यालगत शेती खरेदी केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत केळी तर गडचिरोली जिल्ह्यात रवी परिसरात पेरूची लागवड केली. यावर्षी त्यांनी ६ एकर जागेत केळीची लागवड केली आहे. केळीच्या उत्पादनासाठी मराठवाडा, खानदेशातील शेतीच योग्य समजली जाते. पण पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर ,भंडारा जिल्ह्यातील शेतीची सुपीकता उत्तम असून रासायनिक, सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीने येथील शेतकरी केळीचे चांगले उत्पादन घेऊ शकतात, असे मारुती लाड सांगतात.
लाड यांनी सहा एकर शेतीत दोन टप्प्यात लागवड केली आहे, जेणेकरून एखाद्या बहरात केळीला योग्य भाव मिळाला नाही तर पुढील बहरात मिळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. नांगरणीपासून ते बाजारात ग्राहकांच्या हातात केळीचे उत्पादन पडेपर्यंत एकरी ६० हजार रुपयांचा अंदाजे खर्च आहे. त्यातून अडीच ते तीन लाखापर्यंत उत्पादन होते. त्यामुळे केळीची शेती नगदी पीक देणारी व नफ्याची शेती असल्याचे ते सांगतात.
बाॅकस
सिंचन योजनेचा वापर
मारुती लाड यांनी जल व मृदा संवर्धन करून केळीची बाग फुलवण्यासाठी ठिबक सिंचन योजना वापरली आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन व आवश्यक ठिकाणी झाडाला पाणी देणे, यामुळे कमी पाण्यात चांगली शेती होत असून केळीबरोबर पेरूची लागवड देखील केली आहे. बोअरवेल जलस्त्रोत वापरून शेतीच्या योग्य व्यवस्थापनामुळे हे शक्य आहे.