पाच हजार एकरवर होणार सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:54 PM2018-07-08T23:54:59+5:302018-07-08T23:55:29+5:30

आत्माच्या पुढाकाराने यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार एकरवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत. रासायनिक खतांमुळे कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण झाली.

Organic Farming to be 5000 acres | पाच हजार एकरवर होणार सेंद्रिय शेती

पाच हजार एकरवर होणार सेंद्रिय शेती

Next
ठळक मुद्दे‘आत्मा’चा पुढाकार : जिल्ह्यातील १,२०० शेतकरी सहभागी

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आत्माच्या पुढाकाराने यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार एकरवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत.
रासायनिक खतांमुळे कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण झाली. उत्पादनात दुपटीने वाढ झाली. मात्र दिवसेंदिवस आता रासायनिक खते व कीटकनाशकांचे दुष्परिणाम मानवी आरोग्यासह जमिनीवर सुद्धा होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी होत चालली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा मारा असाच सुरू राहिल्यास जमीन पूर्णपणे नापीक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याचा उपाय सुचविला जात आहे.
शेतकऱ्यांना रासायनिक खते व कीटकनाशके वापरायची सवय झाली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती नेमकी कशा पध्दतीने करावी याबाबतचे ज्ञानही नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार आत्माने पुढाकार घेत मागील तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी जिल्हाभरातून शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत. २०१६-१७ या वर्षात १ हजार ५०० एकरवर सेंद्रिय शेती करण्यात आली. २०१७-१८ या वर्षात २ हजार ५० एकरवर सेंद्रिय शेती झाली. तर २०१८-१९ या वर्षात पाच हजार एकरवर सेंद्रिय शेती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रिय शेतीचे लाभ शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतीखालील क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी आत्माच्या वतीने संबंधित शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. सेंद्रिय खत व कीटकनाशके तयार करण्यासाठी आवश्यक असलेले काही प्रमाणात साहित्य सुद्धा अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहेत. सेंद्रिय शेतीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात येत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची आशा वर्तविली जात आहे. जागतिक स्तरावर सेंद्रिय शेतीच्या मालाला विशेष मागणी आहे.
३१ गावांमध्ये केली जात आहे सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती करण्यासाठी ३१ गावांमध्ये ३१ गट तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून १२०० शेतकरी सेंद्रीय शेतीसोबत जोडण्यात आले आहेत. सेंद्रिय शेती होत असलेल्या गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साखरा, नगरी, चामोर्शी तालुक्यातील भिवापूर, वागदरा, मुरखळा चक, भेंडाळा, धानोरा तालुक्यातील मोहगाव, मुलचेरा तालुक्यातील पुल्लीगुडम, कोळसापूर, देसाईगंज तालुक्यातील उसेगाव, आरमोरी तालुक्यातील सुकाळा, गणेशपूर चक, कुरखेडा तालुक्यातील मालदुगी, सावरखेडा, वाढोणा, नवरगाव, कोरची तालुक्यातील बोंडेणा, साल्ले, अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ, रायगट्टा, मेडीगुडम, एटापल्ली तालुक्यातील रेकनार, पेठा, भामरागड तालुक्यातील हिदूर, सिरोंचा तालुक्यातील कोरलामाल, कोटामाल या गावांचा समावेश आहे.
गोप्स नावाची कंपनी रजिस्टर्ड
सेंद्रिय शेतीतील उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या पुढाकारातून गोप्स (गडचिरोली आॅरगॅनिक फार्मिंग सिस्टीम) हा ब्रॅन्ड तयार केला. या ब्रॅन्ड अंतर्गत मागील वर्षी नागपूर, अकोला, चंद्रपूर, पुणे, मुंबई, दिल्ली व गडचिरोलीत सुमारे ३२ लाख रूपयांचे उत्पादन विकण्यात आले. सेंद्रिय शेतीसोबत जोडलेले शेतकरी कायम राहावे, यासाठी गोप्स नावाची कंपनी सुद्धा रजिस्टर्ड करण्यात आली आहे. या कंपनीचे संचालन १२ तालुक्यातील १२ शेतकरी करणार आहेत.

Web Title: Organic Farming to be 5000 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.