आठ कोटींचा मूळ अर्थसंकल्प

By admin | Published: June 8, 2017 01:36 AM2017-06-08T01:36:03+5:302017-06-08T01:36:03+5:30

जिल्हा परिषदेत निवडणुकीनंतर पदारूढ झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवार दि.७ जून रोजी झाली.

The original budget of eight crores | आठ कोटींचा मूळ अर्थसंकल्प

आठ कोटींचा मूळ अर्थसंकल्प

Next

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सादर : अनेक विषयांवर विरोधी सदस्यांची आक्रमक भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेत निवडणुकीनंतर पदारूढ झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवार दि.७ जून रोजी झाली. अध्यक्षांसह बहुतांश पदाधिकारी नवीन असल्यामुळे विरोधी सदस्यांनी आक्रमक होऊन चर्चा केली. निवडणूक आचारसंहितेमुळे प्रशासकीय यंत्रणेने मार्च महिन्यात मंजूर केलेला नवीन आर्थिक वर्षासाठीचा ८ कोटी ७ लाख ३८ हजारांचा अर्थसंकल्प या बैठकीत सदस्यांच्या अवलोकनार्थ मांडण्यात आला.
जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी आर. डी. जावळेकर, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, महिला व बालकल्याण सभापती जनसुधा बानय्या जनगाम, समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, जिल्हाभरातील जि.प.सदस्य, पं.स. सभापती आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यपालन अधिकारी शंतनू गोयल हे सुटीवर असल्यामुळे सभेला उपस्थित नव्हते. त्यांच्या वतीने उ.मु.का. अधिकारी मुळीक यांनी कामकाज पाहीले.
या सभेपूर्वी वित्त आणि कृषी समितीवर रिक्त असलेल्या एका सदस्याची निवड करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ च्या अंतिम सुधारित १६ कोटी ४८ लाख ४८ हजार रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तसेच २०१७-१८ चे मूळ अंदाजपत्रक सदस्यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आले.
यानंतर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना, आणि जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना किमान गरजा कार्यक्रमांतर्गत रस्ते व पुलाच्या नियोजनावर चर्चा झाली. या चर्चेत विरोधी सदस्यांनी सूचविलेल्या सुधारणांवर चर्चा करताना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी अभियंत्यांची खरडपट्टी काढली. सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च असल्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो येथेच घ्या, असे ठणकावले.
या चर्चेत प्रामुख्याने काँग्रेसचे अतुल गण्यारपवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ पाटील बोरकुटे, तसेच मनोहर पोरेटी, अ‍ॅड.राम मेश्राम आदी अनेक सदस्यांनी आक्रमकता दाखविली. ही बैठक सुरू होण्याची वेळ दुपारी १ वाजता होती. मात्र जवळपास २.३० वाजता बैठकीला सुरूवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.

अन् पत्रकारांना बाहेर जावे लागले
या बैठकीत जिल्हा परिषदेचे सदस्य, पं.स.सभापती आणि अधिकारी वर्ग यांच्याशिवाय कोणीही बसू नये, असे निर्देश सभेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी सभा सुरू असताना दिले. यामुळे वृत्त संकलनासाठी शेवटच्या रांगेत बसलेल्या काही पत्रकारांना उठून सभागृहाबाहेर जावे लागले. वास्तविक कामात पारदर्शकता ठेवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या अधिवेशनाप्रमाणे जिल्ह्याच्या या ‘मिनी मंत्रालया’तही सर्वसाधारण किंवा विशेष सभेत पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी बसू द्यावे, असा सूर यानंतर सर्वत्र उमटत होता.

अध्यक्ष उत्तरच देईना
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा कोणताही अनुभव नसताना पहिल्यांचा निवडून येऊन पहिल्यांदाच अध्यक्षपद पदरी पडलेल्या योगिता भांडेकर यांची सर्वसाधारण सभेचे कामकाज सांभाळताना काहीशी तारांबळ उडत होती. अनुभवी असलेल्या काही विरोधी सदस्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला योग्यपणे टोलवणे त्यांना जमत नसल्यामुळे त्यांनी सभेत बहुतांश वेळ निरूत्तर होऊन राहणेच पसंत केले.

 

Web Title: The original budget of eight crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.