शहरी भागातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:52 PM2018-09-01T15:52:00+5:302018-09-01T15:54:02+5:30
शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत. नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या प्रा.साईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती असून पुढील काळात त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत वरवरा राव याच्यासह एकूण पाच जणांना नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली स्थानबद्ध केले आहे. त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात राहून विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, शेतकरी, कामगार, सांस्कृतिक संघटनांमार्फत सरकारविरूद्ध माओवादाचे ‘स्लो पॉयझन’ ते देतात. त्यासंबंधीचे भक्कम पुरावेसुद्धा असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सामाजिक अशांतता निर्माण करून सरकारविरूद्ध आवाज उठवणे आणि बंदूक हातात घेऊनच आपले हक्क मिळतील, हे त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात आहे. जे लोक यातून प्रभावित होतात त्यांना हेरून संघटनेत सक्रिय करणे, अशी नागरी क्षेत्रात वावरणाऱ्या नक्षल समर्थकांची कार्यपद्धती आहे.
हैदराबाद येथे ज्या वरवरा राव याला स्थानबद्ध करण्यात आले तो नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हॅल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटचा (आरडीएफ) अध्यक्ष आहे. प्रा.साईबाबा हा याच संघटनेचा सचिव म्हणून काम पहात होता. नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करून २००४ मध्ये आरडीएफची स्थापना करण्यात आली. नक्षल चळवळीसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करण्यासोबतच चळवळीसाठी पैसा गोळा करण्याचे कामही ही संघटना करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
१०० गावांत सरकार स्थापण्याचा उद्देश
गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई केलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाड, भामरागड भागातील १०० गावांत ‘आपले सरकार’ स्थापन्याचा संकल्प नक्षलींनी २००३ मध्ये केला होता. नागरिकांना आपल्या प्रभावाखाली आणून आपली हुकूमत गाजविण्याचा नक्षलींचा उद्देश काही प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र अलिकडे पोलिसांनी आक्रमक कारवाईसोबतच नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोलीस व लोकशाही व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण केल्याने नक्षलवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत.