सिझरदरम्यान कापली दुसरीच नस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:42 PM2019-02-21T23:42:07+5:302019-02-21T23:42:46+5:30
सिझर करताना डॉक्टरांनी लघवीची नस कापल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात २५ मे २०१७ रोजी घडला. त्यामुळे आपल्याला शासनाकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी पीडित महिला सुशोगीता मुकेश बेडोले रा. परसटोला ता. अर्जुनी जि. गोंदिया यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर गुरूवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिझर करताना डॉक्टरांनी लघवीची नस कापल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात २५ मे २०१७ रोजी घडला. त्यामुळे आपल्याला शासनाकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी पीडित महिला सुशोगीता मुकेश बेडोले रा. परसटोला ता. अर्जुनी जि. गोंदिया यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर गुरूवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सुशोगीता हिला २४ मे २०१७ रोजी कुरखेडा ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी भरती केले. तिला सिझर व पुढील तपासण्यासाठी गडचिरोली रूग्णालयात पाठविण्यात आले. २६ मे रोजी डॉ. चोखांदरे व डॉ. बोकडे यांनी सिजर केला. सिझर करतेवेळी लघवीची नस कापली. मात्र याबाबतची माहिती डॉक्टरांनी रूग्ण व नातेवाईकांना दिली नाही. त्यानंतर सुशोगीताला चंद्रपूर येथे हलविले. उपचार सुरू केले मात्र फारसा आराम झाला नाही. नळी बसविण्यात आली आहे. परंतु प्रत्येक महिन्याला नळी बदलवावी लागते. त्यामुळे पीडित महिला त्रस्त झाली आहे. डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांना लोकमतने विचारणा केली असता, या प्रकरणाची चौकशी झाली आहे. वरिष्ठांकडून अभिप्राय मागितला आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र वरिष्ठांना दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजनेंतर्गत मोफत उपचार करून दिला जाईल, अशी माहिती डॉ. रूडे यांनी दिली.