अन्यथा आपण जिवंतच नसतो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:18 PM2019-01-22T23:18:10+5:302019-01-22T23:18:29+5:30
ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या ट्रकची आता आपल्या बसला धडक बसणार ही बाब लक्षात घेऊन एसटीचे ब्रेक करकचून दाबत बस बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या ट्रकची आता आपल्या बसला धडक बसणार ही बाब लक्षात घेऊन एसटीचे ब्रेक करकचून दाबत बस बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. अन्यथा माझ्यासह बसमधील कोणी प्रवासी जीवंत राहण्याची शक्यता नव्हती, अशी आपबिती गुरुपल्ली येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या अपघातातील एसटीच्या चालकाने सांगितली.
अपघातग्रस्त बसचे चालक हेमंत पुल्लीवार हे या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. सदर प्रतिनिधीने त्यांचे रुग्णालयात भेट घेती असता त्यांनी त्या दिवशीचा प्रसंग सांगितला.
गुरूपल्ली येथून एक प्रवासी व शाळकरी मुलगी बसमध्ये बसली. त्यामुळे बसचा वेग कमीच होता. गुरूपल्लीपासून दोन किमी अंतरावर लांब रांगेत अनेक ट्रक विरूध्द दिशेने येत होते. आधीच मार्ग अरूंद असल्याने ओव्हरटेक करण्यास जागा नसताना एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची बसला जोरदार धडक बसली. ट्रकची बसला धडक बसणार हे लक्षात येताच मी जागेवरच बसून बसचे ब्रेक जोरात दाबून ठेवले. त्यामुळे हाणी कमी होण्यास मदत झाल्याचे पुल्लीवार यांनी सांगितले.
दोन्ही ब्रेक दाबल्याने बस जागेवरच थांबून होती. ब्रेक दाबले नसते तर ट्रकच्या जोरदार धडकेने बस बाजुला फेकल्या गेली असती आणि मृतांचा आकडा वाढला असता, असा थरारक अनुभव पुल्लीवार यांनी सांगितला. पायाला गंभीर दुखापत झाल्याने यापुढे बस चालवू शकणार की नाही, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.