धानोरातील ३९ शाळा विजेविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:58 PM2018-10-20T23:58:09+5:302018-10-20T23:58:34+5:30
विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या मदतीने अध्यापन करावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी धानोरा तालुक्यातील एकूण १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही.
घनश्याम मशाखेत्री।
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या मदतीने अध्यापन करावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी धानोरा तालुक्यातील एकूण १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्येवीज उपलब्ध नाही. यामध्ये १० शाळांमध्ये वीज पुरवठा नाही तर २९ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेने खरेदी केलेली डिजिटल साधने अजूनही धूळखात पडून आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव राहत असल्याने शहर व ग्रामीण भागातील पालकवर्ग खासगी कॉन्व्हेंटकडे वळत होते. परिणामी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळा ओस पडायला लागल्या होत्या. मात्र आता शासनाने जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविल्यास विद्यार्थ्यांमधील चिकित्सकवृत्ती जागरूक होते. त्याचबरोबर डिजिटल साधनांमुळे अध्यापन सुधारण्यास मदत होत असल्याने शाळांनी डिजिटल साधने खरेदी करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. शाळांनी लोकसहभागातून डिजिटल साधने खरेदी केली. ही सर्व साधने चालविण्यासाठी शाळेमध्ये वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. मात्र धानोरा तालुक्यातील १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्ये वीज पुरवठा झालाच नाही. काही गावे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या गावांपर्यंत विद्युत पुरवठा झाला नाही. त्यामुळे शाळेतही वीज पोहोचली नाही. मात्र काही गावांमध्ये वीज पोहोचली असतानाही शाळेत वीज पुरवठा झाला नसल्याचे वास्तव आहे. शाळेत वीज नसल्याने शिक्षकांनी खरेदी केलेले साहित्य तसेच धूळखात पडून आहेत. परिणामी शिक्षक व विद्यार्थ्यांना पारंपरिक साधनांच्या मदतीनेच शिकवित आहेत. २९ शाळांचा वीज पुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. शाळांचे वीज बिल भरण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा शाळा वीज बिल भरू शकत नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित होतो.
शाळेचा बहुतांश खर्च लोकवर्गणीतून करावा लागतो. दुर्गम भागातील आदिवासीबहुल गावातील पालक गरीब राहत असल्याने ते जास्त प्रमाणात लोकवर्गणीसुद्धा देऊ शकत नाही. परिणामी शाळेची आर्थिक परिस्थिती बेताची राहत असल्याने अधिकचे वीज बिल आल्यास शाळा सदर बिल भरू शकत नाही. शासनाने वीज बिल भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. धानोरा तालुक्याबरोबरच जिल्हाभरातील शाळांचीही हीच स्थिती आहे. शेकडो शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
संरक्षक भिंतीअभावी शाळांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला
धानोरा तालुक्यातील सुमारे ३७ शाळांना संरक्षक भिंत नाही. त्यामुळे शाळेच्या परिसरात मोकाट जनावरे, डुक्कर, कुत्रे यांचा वावर राहत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील बहुतांश शाळांकडे मोठ्या प्रमाणात पटांगण उपलब्ध आहे. या पटांगणात बगीचा लावणे शक्य असले तरी जनावरांपासून बगीचाचा बचाव करण्यासाठी संरक्षक भिंत आवश्यक आहे. संरक्षक भिंतच नसल्याने जागा पडीक आहे. सर्वशिक्षा अभियानच्या माध्यमातून यापूर्वी शाळाबांधकाम, संरक्षक भिंत बांधकाम यासाठी निधी उपलब्ध होत होता. आता हा निधी बंद झाल्याने अडचण वाढली आहे.