घराबाहेर पडणाऱ्यांची गडचिरोली वाहतूक पोलिसांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:46+5:30
राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव घेतला. त्यानंतर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने २३ जानेवारीपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाºया वाहनधारकांचे वाहन अडवून गडचिरोली वाहतूक पोलीस तपासणी करीत असल्याचे चित्र गुरूवारी गडचिरोलीत पहायला मिळाले. घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात आहे. कारणाशी संबंधित कागदपत्रे किंवा इतर वस्तू दाखविल्यावरच त्यांना सोडले जात आहे.
राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव घेतला. त्यानंतर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली. मात्र पोलिसांच्या धोरणावर राज्यभरातून टिका सुध्दा झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक मारू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानुसार आता गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस ये-जा करणाऱ्या नागरिकांचे वाहन अडवून बाहेर निघण्याचे कारण विचारत आहेत. एखादे कारण सांगितल्यानंतर त्याच्याशी संबंधित कागदपत्रे किंवा इतर वस्तू आहेत काय, हे सुध्दा विचारले जात आहे. एखाद्या व्यक्तीने भाजीपाला घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले तर त्याच्याकडे थैली आहे काय हे बघितले जाते. मेडीकलमध्ये जातो असे सांगितले तर त्याच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी आहे काय, हे बघितले जात आहे. तसेच संपूर्ण शहरात गस्त घालून नागरिक अनावश्यक बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक अजुनही नियंत्रणात आहे.
नागरिकांनी गैरफायदा घेऊ नये
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच शासनाने संचारबंदी, लॉकडाऊन हे कठोर निर्णय घेतले आहेत. संचार बंदीतही आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आले आहे. त्यादृष्टीनेच पोलीस विचारपूस करीत आहेत. ठोस कारण सांगितल्यानंतरच सोडले जात आहे. मात्र या संधीचा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
गडचिरोलीच्या गुजरीत पोलीस तैनात
गडचिरोली येथे भरणारा आठवडी बाजार रद्द झाला आहे. तसेच इतर ठिकाणी होणारी भाजी विक्री सुध्दा बंद झाली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक गडचिरोली शहरातील गुजरीत मोठ्या प्रमाणात येत आहेत. गुजरीमध्ये गर्दी उसळून भाजीपाला खरेदी करताना मोठी गर्दी उसळते. तसेच अंतर ठेवण्याचे नियमही पाळले जात नव्हते. ही बाब लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने अंतर पाडण्यासाठी डबे आखले आहेत. तसेच गुजरीत तीन पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेते व ग्राहक अंतराच्या नियमाचे पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.