१ मार्चपासून शाळाबाह्य मुलांचा घेतला जाणार शाेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:12 AM2021-02-28T05:12:29+5:302021-02-28T05:12:29+5:30
गडचिराेली : ६ ते १४ या वयाेगटातील बालक सतत एक महिन्यापासून अनुपस्थित राहिल्यास त्याला शाळाबाह्य बालक असे म्हटले ...
गडचिराेली : ६ ते १४ या वयाेगटातील बालक सतत एक महिन्यापासून अनुपस्थित राहिल्यास त्याला शाळाबाह्य बालक असे म्हटले जाते. या बालकांचा शाेध घेण्यासाठी दिनांक १ ते १० मार्च या कालावधीत शिक्षण विभागामार्फत जिल्हाभरात विशेष माेहीम राबवली जाणार आहे.
बालकांच्या माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, अधिकारी अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयाेगटातील प्रत्येक बालकाला शिक्षण देणे आवश्यक आहे. बहुतांश विद्यार्थी शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, राेजगाराच्या शाेधात स्थलांतरित हाेणाऱ्या पालकांचे पाल्य बऱ्याचदा शाळेत जात नाहीत. या बालकांचा शाेध घेऊन त्यांचे नाव शाळेत दाखल करायचे आहे. शहरातील गजबलेल्या वस्त्या, बसस्थानक, वीटभट्ट्या, स्थलांतरित कुटुंब, झाेपड्या, फुटपाथ आदी ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थी आढळण्याची शक्यता सर्वाधिक राहते. त्यामुळे या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करून शाेधमाेहीम राबवायची आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारीसुद्धा या माेहिमेत सहभागी हाेणार आहेत. दिनांक १ ते १० मार्च या कालावधीत शाेधमाेहीम राबवायची आहे. या शाेधलेल्या शाळाबाह्य मुलांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे. दाेन वर्षांपूर्वी अशाप्रकारची माेहीम शासनाने राबवली हाेती, हे विशेष.