टीईटी नसलेल्या 500 वर शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:38+5:30
टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक प्रामुख्याने अंशत: अनुदानित असलेल्या शाळांमध्ये आढळून येतात. यातील काही शिक्षक फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झाले असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे आवश्यक करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण हाेण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली हाेती. मात्र यातील जवळपास ४० शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्वच माध्यमाच्या शिक्षकांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा उत्तीर्ण हाेणे सक्तीचे केले आहे. मात्र जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच अंशत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाहीत. अशा शिक्षकांच्या नाेकऱ्या आता धाेक्यात येण्याची शक्यता आहे.
खासगी शिक्षण संस्थांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळांना मान्यता देण्याचे धाेरण राज्य शासनाने २००२ पासून अंमलात आणले. गडचिराेली जिल्ह्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावरील ७२ शाळा हाेत्या. त्यापैकी ८ शाळा बंद करण्यात आल्या. ६० शाळांना २० ते ४० टक्केपर्यंत अंशत: अनुदान दिले जात आहे. ४ शाळांचे पुन:प्रस्ताव अनुदानासाठी पाठविण्यात आले आहेत.
टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक प्रामुख्याने अंशत: अनुदानित असलेल्या शाळांमध्ये आढळून येतात. यातील काही शिक्षक फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झाले असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे आवश्यक करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण हाेण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली हाेती. मात्र यातील जवळपास ४० शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना सेवेत कायम ठेवण्याबाबतच्या याचिका औरंगाबाद खंडपीठात करण्यात आल्या आहेत. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने या शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात आल्या आहेत.
इंग्रजी शाळांनाही टीईटी उत्तीर्ण शिक्षक सक्तीचे
खासगी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून परवानगी घेतात. त्यामुळे या शाळांना शासनाचे सर्वच नियम पाळणे आवश्यक आहे. राज्य बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधील शिक्षक टीईटी असणे आवश्यक आहे; तसेच सीबीएससी बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याने या शाळांमधील ९९ टक्के शिक्षक टीईटी व सीईटी उत्तीर्ण झाले नसल्याचे दिसून येतात. या शाळांनाही टीईटी व सीटीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षक नेमण्याची सक्ती करण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षक भाग्यशाली
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची नियुक्ती २०१३ पूर्वीची आहे. २०१९ मध्ये जवळपास ५० शिक्षकांची भरती करण्यात आली हाेती. हे सर्वच शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना या निकालाने काहीच फरक पडला नाही.
- टीईटी परीक्षा सर्वसाधारण कठिण राहते. मात्र अंशत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक ४० ते ५० वर्षाच्या दरम्यानचे आहेत. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनेकांना कठिण जात आहे. त्यामुळेच ते सुट देण्याची मागणी करीत आहेत.
शिक्षणाधिकारी म्हणतात, चारच शिक्षक
जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसलेले चारच शिक्षक आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी निकम यांनी दिली आहे. मात्र ‘लाेकमत’ने काही मुख्याध्यापकांना फाेन करून विचारले असता, टीईटी उत्तीर्ण नसलेले ४० पेक्षा अधिक शिक्षक असल्याची शक्यता वर्तविली आहे.
आयुष्याच्या शेवटी नाेकरी मिळाली;
तीही जाण्याचा धाेका; शिक्षक पडले चिंतेत
काही शिक्षक २०१३ पूर्वीच शाळांमध्ये शिकवायला लागले. मात्र त्यांच्या पदाला मान्यता २०१३ नंतर घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षक टीईटीच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. या शाळांमध्ये कार्यरत असलेले काही शिक्षक ४५ ते ५० वर्षांचे आहेत. नाेकरीच्या शेवटच्या टप्प्यात वेतन सुरू झाले; मात्र टीईटी नसल्याने आता नाेकरी जाण्याचा धाेका आहे. नाेकरी गेल्यास संसार कसा करावा, असा प्रश्न शिक्षकांसमाेर निर्माण झाला आहे.