शाळाबाह्य मुले शाेधमाेहीमेवर ८०० वर शिक्षक व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:21+5:302021-03-08T04:34:21+5:30
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ ते १० मार्च या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शाळाबाह्य मुले शाेधमाेहीम राबविली ...
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ ते १० मार्च या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शाळाबाह्य मुले शाेधमाेहीम राबविली जात आहे. गडचिराेली तालुक्यासह जिल्ह्यात ही शाेधमाेहीम ३ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरातील जवळपास ८७१ शिक्षक सध्या या कामात लागले आहेत.
जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील एकही मूल किंवा मुलगी शाळाबाह्य राहू नये, असे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे धाेरण आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून ही माेहीम प्रभावीरित्या राबविली जात आहे.
बाराही तालुकास्तरावरील गटसाधन केंद्राच्या वतीने शाळाबाह्य मुले, मुली शाेधण्याच्या या माेहिमेचे नियाेजन करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील शिक्षकांची यादी करण्यात आली असून संबंधित शिक्षकांना विशिष्ट परिसर नियाेजित करून दिला आहे. १० मार्चपर्यंत ही शाेधमाेहीम राबवून तसा अहवाल सादर करावयाचा आहे. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी या माेहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
बाॅक्स...
अंगणवाडी सेविका, मदतनीस देताहेत याेगदान
६ ते १८ वर्षे वयाेगटातील शाळाबाह्य मुले व मुलींचा शाेध शिक्षक गावाेगावी फिरून घेत आहेत. तर ३ ते ६ वर्ष वयाेगटातील बालकांचा शाेध अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना घ्यावयाचा आहे. गडचिराेली तालुक्यासह काही गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सकाळच्या सुमारास फेरफटका मारून शाळाबाह्य मुला, मुलींबाबत सर्वेक्षण करीत आहेत. यासंदर्भात अंगणवाडी सेविकांची गटसाधन केंद्राच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शिवाय एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही पत्रव्यवहार करून सहकार्य मागविण्यात आले आहे.
बाॅक्स...
अन्य कर्मचाऱ्यांचा तुर्तास सहभाग नाही
शाळाबाह्य शाेध माेहिमेत नगर परिषद, नगर पंचायत, आराेग्य, कामगार अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी, स्वयंसेवी संस्था व शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. गावातील संपूर्ण माहिती असलेला कर्मचारी म्हणजे ग्रामसेवक हाेय. या घटकाचा सुद्धा सदर माेहिमेत सहभाग घेता येणार आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात शिक्षण विभाग वगळता इतर काेणत्याही कर्मचाऱ्यांनी सध्यातरी या माेहिमेत सहभाग दर्शविला नाही.
बाॅक्स...
अधिकारी अद्याप फिरकलेच नाही !
- शाळाबाह्य मुले, मुली शाेधण्याची ही माेहीम याेग्यरित्या राबविण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचा सहभाग राहणार आहे.
- गडचिराेली जिल्ह्यात सध्या तरी प्रत्यक्ष त्या-त्या भागात जाऊन काेणतेही अधिकारी शाळाबाह्य मुले, मुली शाेधमाेहिमेत सहभागी झालेे नाहीत. मात्र येत्या दाेन-तीन दिवसांत शिक्षण विभागाचे अधिकारी झाेपडपट्टी भागात जाऊन माेहिमेत सहभागी हाेणार आहेत.
काेट...
शाळाबाह्य मुले शाेधमाेहिमेचे नियाेजन तालुका व जिल्हास्तरावर करण्यात आले आहे. गटसाधन केंद्राचे कर्मचारी ही माेहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत नियाेजन बैठका पार पडल्या. शिक्षक घराेघरी जाऊन याबाबत सर्वे करीत आहेत.
- आर.पी.निकम, शिक्षणाधिकारी