दोन लाखांसाठी पालकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:58 AM2019-02-03T00:58:12+5:302019-02-03T01:00:04+5:30
‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत एक साधा अर्ज भरून तो दिल्ली येथील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या नावाने पाठविल्यास दोन लाख रूपयांची रक्कम बँक खात्यात जमा होते. या अफवेने शहर व ग्रामीण भागातील मुलींचे पालक अर्ज करण्यात व्यस्त आहेत.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत एक साधा अर्ज भरून तो दिल्ली येथील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या नावाने पाठविल्यास दोन लाख रूपयांची रक्कम बँक खात्यात जमा होते. या अफवेने शहर व ग्रामीण भागातील मुलींचे पालक अर्ज करण्यात व्यस्त आहेत. गडचिरोली येथील पोस्ट आॅफीसमध्ये मुली व त्यांच्या पालकांची मोठी गर्दी मागील आठ दिवसांपासून दिसून येत आहे.
केंद्र शासनाने ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ ही योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेंतर्गत लाभार्थ्याला रक्कम देण्याची कोणतीच तरतूद नाही. असे असतानाही या योजनेच्या नावावर एक बनावट अर्ज तयार करण्यात आला आहे. ८ ते ३२ वर्षापर्यंतच्या मुली योजनेस पात्र ठरतील, असे अगदी अर्जाच्या वरच्या बाजूस लिहिले आहे. या अगदी साध्या अर्जामध्ये नाव, पत्ता, वार्षिक उत्पन्न, जन्मतारीख, शैक्षणिक योग्यता, आधार क्रमांक, पत्ता, ईमेल आयडी, धर्म, जात, बँक खाता क्रमांक, आईएफसी कोड टाकायचा आहे. या अर्जावर सरपंच किंवा नगरसेवकाची स्वाक्षरी घ्यायची आहे. अर्जाच्या सर्वात खाली हा अर्ज केल्यानंतर दोन लाख रुपये मिळतील, असे लिहिण्यात आले आहे. तसेच अर्ज पाठविण्याचा पत्ता म्हणून भारत सरकार महिला एवं बाल विकास मंत्रालय, शास्त्री भवन दिल्ली असा दिला आहे. हा अर्ज गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील एका झेरॉक्स सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दोन लाख रूपये मिळतील या आशेने पालक वर्ग अर्ज भरून तो पोस्टामार्फत पाठविला जात आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी आहे. या अर्जासोबत केवळ जन्माचा दाखला, बँक अकाऊंटची झेरॉक्स जोडली जात आहे. सरपंच व नगरसेवक यांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांच्याकडेही गर्दी होत आहे. सरपंच व नगरसेवक हे सुध्दा कोणतीही शहानिशा न करता केवळ स्वाक्षरी करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या योजनेबाबतची अफवा पुन्हा वेगाने पसरत चालली आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी पुन्हा पालकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या अफवा इतरही जिल्ह्यांमध्ये यापूर्वी पसरल्याने अशाच प्रकारे अर्ज करण्यासाठी गर्दी झाली होती. अशी योजना नसल्याची जनजागृती प्रशासनाला करावी लागली होती.
गोपनीय माहिती उघड होण्याची भीती
अर्जामध्ये आधार क्रमांक, बँक खाता क्रमांक, आयएफसी कोड देण्यात येत आहे. अनेकांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करण्यात आले आहेत. आधार कार्ड व बँक खाते क्रमांक माहित झाल्यानंतर त्याचा दुरूपयोग होण्याची भिती नाकारता येत नाही. त्याचबरोबर अर्जात ३२ वर्षापर्यंतची मर्यादा देण्यात आली आहे. भारतातील बहुतांश मुलींचे लग्न २५ च्या आतमध्येच आटोपतात. त्यामुळे अर्जानुसार ३२ वर्षांची माहिला सुध्दा पात्र ठरणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिकारी म्हणतात, अशी योजनाच नाही
शासन कोणतीही योजना राबविताना स्थानिक पातळीवरील यंत्रणेमार्फत राबविली जाते. मात्र अचंबित करणाऱ्या या योजनेची माहिती कोणत्याही अधिकाºयाला नाही. नागरिक परस्पर अर्ज दिल्ली येथे पाठवित आहेत. एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर भाराभर वजनाचे कागदपत्रे जोडावी लागतात. त्यात एकही प्रमाणपत्र कमी पडल्यास अर्ज प्रलंबित ठेवला जातो. असे असताना केवळ नाव, गाव लिहिलेल्या अर्जाच्या भरवशावर दोन लाख रूपये संबंधित अकाऊंटवर कसे काय टाकले जातील, असा प्रश्न सुज्ञ व्यक्तींकडून उपस्थित केला जात आहे.
दुसरा व्यक्ती भरत आहे म्हणून आपणही भरत आहो, अशी माहिती बहुतांश पालकांनी लोकमतला दिली. मात्र यामध्ये पालकांचे जवळपास १०० रूपये खर्च होत आहेत तर दिवसभराची मजुरी बुडत आहे. ज्या पोस्ट कार्यालयात गर्दी होत आहे, त्यांनाही या योजनेची माहिती नाही. आलेला लिफाफा रजिस्ट्री करून तो संबंधित पत्यावर पाठविणे. एवढेच आपले काम आहे, अशी माहिती पोस्टातील अधिकाºयांनी दिली आहे.
बेटी बचाओ, बेटी पढाओ ही केंद्र शासनाची योजना आहे. मात्र या योजनेंतर्गत कोणालाही पैसे देण्याची तरतूद नाही. नागरिकांना कुठून अर्ज प्राप्त झाला, कोणी भरायला सांगितले, तो अर्ज पाठविल्यावर किती पैसे मिळणार, याबाबत आपल्या कार्यालयाला काहीही माहिती नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून सदर योजनेंतर्गत नागरिकांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना नाही.
-अतुल भडांगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली